शेतकऱ्यांना कलम बांधणीचे धडे
किनगावराजा : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला संलग्नित कृषी महाविद्यालय, रिसोड येथील कृषिदूत महेश उगलमुगले, प्रथमेश देशमुख, सोमनाथ रिंढे, मयुरेश इंगळे, गोपाल बुंधे, गोविंद परिहार, वैष्णवी राजपूत, स्नेहल इंगळे, उज्ज्वला भगत, अश्विनी शेळके यांनी कृषी ग्रामीण कृषी कार्यानुभव अंतर्गत शेतकऱ्यांना कलम बांधणीचे धडे दिले. यावेळी गावातील शेतकरी उपस्थित होते. या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आप्तुरकर, प्रा. मसुडकर, प्रा. बाजड, प्रा. हरणे, डॉ. देवडे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
सिंदखेडराजा येथे पोलिसांचे पथसंचलन
सिंदखेडराजा : गणपती उत्सव काळामध्ये शांतता राहावी म्हणून स्थानिक पोलीस स्टेशनच्या वतीने संपूर्ण शहरातून ठाणेदार केशव वाघ यांच्या नेतृत्त्वात रुट मार्च काढण्यात आला. शहरात गणपती उत्सव व गौरी पूजन या काळामध्ये सामाजिक सलोखा कायम राहावा म्हणून संपूर्ण शहरातून पथसंचलन करण्यात आले. शहरातील राजवाडा परिसर, त्रिगुणी गल्ली, माणिक चौक, नागपूर डाक लाईन गल्ली, बालाजी गल्ली या मार्गाने रूट मार्च काढण्यात आला. याप्रसंगी ठाणेदार केशव वाघ यांच्यासह पोलीस निरीक्षक मधुसुदन घुगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राठोड, पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर दहातोंडे, सहाय्यक फौजदार प्रदीप वायाळ, प्रवीण डोईफोडे, सुनील सोळंके आदी सहभागी झाले होते.
रोहित्रामधील ऑईल चोरी, गुन्हा दाखल
चिखली : विद्युत रोहित्रामधील ऑईल चोरी प्रकरणी पोलिसांनी गुरुवारी एका अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. महावितरणचे आतिश सीताराम शर्मा यांनी अमडापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, उतरादा येथील सतीश अर्जुन काळे यांच्या शेतातील विद्युत रोहित्रामधील ऑईल अज्ञात इसमाने चोरुन नेले. त्यामुळे महावितरणचे १ हजार ९०० रुपयांचे नुकसान झाले आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
तळणी येथे भागवत सप्ताहाची सांगता
मोताळा : तालुक्यातील तळणी येथे भागवत कथा सप्ताहाचे २९ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर दरम्यान आयोजन करण्यात आले होते. कथेचे वाचन प्रदीप महाराज कोल्हीडकर यांनी केले. सायंकाळी महिलांनी गीता, भजन व हरिपाठाचे वाचन केले. ५ सप्टेंबरला गावातून मोठ्या उत्साहात दिंडी सोहळा काढण्यात आला. महिलांनी आपल्या अंगणात सडा, रांगोळी काढून ठिकठिकाणी दिंडीचे स्वागत केले.