लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: गुलाबी बोंडअळीमुळे बुलडाणा जिल्हय़ातील १ लाख हेक्टरवरील कपाशी पिकाचे नुकसान झाल्याचे सर्वेक्षण अहवालातून समोर आले असून, तब्बल १ लाख कापूस उत्पादक शेतकर्यांना याचा फटका बसला आहे. परिणामी जिल्हय़ातील कापूस उत्पादक शेतकर्यांना ५00 कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या नुकसान भरपाईची गरज असल्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.एक महिन्यापूसन गुलाबी बोंडअळीमुळे झालेल्या नुकसानाचा सर्व्हे प्रत्यक्ष शेतावर जाऊन करण्यात येत असून, जीओ टॅगिंगसह तांत्रिक बाबींचा सर्व्हेमध्ये समावेश असल्याने उशीर होत आहे. दहा दिवसांमध्येच हा सर्व्हे करण्याचे निर्देश यंत्रणेला होते. जिल्हय़ातील ३५0 कृषी सहाय्यकांसह गावातील तलाठी, ग्रामसेवक, गावातील सरपंच, उपसरपंच यांच्या समक्ष हे सर्वेक्षण करण्यात येत आहे. एक लाख ७५ हजार ५ हेक्टरवर यावर्षी कपाशीचा पेरा झाला आहे; मात्र गुलाबी बोंडअळीमुळे बहुतांश कपाशीचे क्षेत्र बाधित झाले आहे. काही ठिकाणी त्याची तीव्रता अधिक आहे तर काही ठिकाणी त्याची तीव्र कमी आहे. त्याच्या आधारावर येत्या काळात शेतकर्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे; मात्र त्यास बराच कालावधी लागण्याची शक्यता आपत्ती व्यवस्थापन विभागातील सूत्रांनी व्यक्त केली. एक जानेवारीअखेर बुलडाणा जिल्हय़ातील एकूण बाधित कपाशी क्षेत्रापैकी ९९ हजार ५२७.२४ हेक्टरवली सर्वेक्षण पूर्ण झाले असून, ९८ बजार ७४१ शेतकर्यांच्या शेतात जाऊन कृषी विभागाने हा सर्व्हे केला आहे.
५00 कोटींच्या नुकसानाचा अंदाजबुलडाणा जिल्हय़ात आणखी काही दिवस हा सर्व्हे चालणार असून, शेतकर्यांचे बोंडअळीमुळे सुमारे ५00 कोटी रुपयांपेक्षाही अधिक नुकसान झाल्याचा अंदाज कृषी विभागातील सूत्रांनी वर्तवला आहे. यासंदर्भातील अंतिम अहवाल अद्याप तयार झाला नसून, तो येत्या आठ दिवसात होण्याचा अंदाज सूत्रांनी व्यक्त केला. दरम्यान, अद्याप जिल्हाधिकारी, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी आणि जिल्हा कृषी अधिकारी यांच्या संयुक्त सहीचा अहवाल तयार झालेला नाही. त्यामुळे अंतिम अहवालादरम्यान, कापसामुळे झालेल्या नुकसानाचा अंदाज बदलण्याची शक्यताही असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.