संदीप वानखडे
बुलडाणा : जिल्हा शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांना देण्यात येणऱ्या आदर्श शिक्षक पुरस्कराचे निकष बदलले आहेत़. त्यामुळे पात्र ठरत नसल्याने अनेक गुरुजींनी प्रस्तावच पाठवणे बंद केल्याचे चित्र आहे़. २६ पुरस्कारांसाठी निकषात बसणारे प्रस्तावच आले नसल्याने केवळ १५ शिक्षकांनाच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले़.
जिल्हा परिषदेच्या वतीने दरवर्षी आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात येताे़. सन २०१६ पासून या पुरस्कारासाठी शासनाने निकष ठरवले आहेत. या निकषात बसत नसल्याने आदर्श जिल्हा पुरस्कारासाठी दाेन वर्षांपासून प्रस्तावच मिळत नसल्याचे चित्र आहे. प्राथमिक आणि माध्यमिकच्या प्रत्येक तालुक्यातून एक अशा २६ शिक्षकांना हा पुरस्कार देण्यात येताे़. गत वर्षापासून काेराेनामुळे ऑनलाईन प्रस्ताव मागवण्यात येत आहेत. यावर्षी २६ पुरस्कारांसाठी केवळ ३२ प्रस्ताव प्राप्त झाले हाेते. त्यातही माध्यमिकचे प्रस्ताव नगण्य हाेते. यापैकी १९ शिक्षकांना कागदपत्रांची छाननी केल्यानंतर मुलाखतीसाठी बाेलावण्यात आले हाेते. त्यापैकी ३० ऑगस्ट राेजी झालेल्या निवड समितीच्या बैठकीत १३ प्राथमिक आणि २ माध्यमिक शिक्षकांची जिल्हा पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. या शिक्षकांच्या पुरस्काराचा प्रस्ताव आता विभागीय आयुक्तांकडे पाठवण्यात आला आहे. विभागीय आयुक्तांच्या मंजुरीनंतर या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.
तीन वर्षांपासून वितरणच नाही
जिल्हा शिक्षक पुरस्कारांचे गत तीन वर्षांपासून वितरणच झालेले नाही़. गतवर्षी काेराेनामुळे पुरस्कार वितरण कार्यक्रमच घेण्यात आला नाही. यावर्षी शिक्षकांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असून लवकरच कार्यक्रमाचे आयाेजन करून पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.
नुसताच मान, धनच नाही
जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात येणाऱ्या पुरस्काराचे एक प्रमाणपत्र, शिल्ड असे स्वरूप आहे. यापूर्वी पुरस्कार प्राप्त शिक्षकांना वेतनवाढ देण्यात येत हाेती़. आता ती बंद केल्याने या पुरस्काराचे नुसताच मान, धनच नाही असे स्वरूप झाले आहे़. प्रस्ताव न सादर करण्याचे हे एक कारण आहे.
गतवर्षी आले हाेते ४१ प्रस्ताव
आदर्श जिल्हा पुरस्कारासाठी गतवर्षी ४१ प्रस्ताव मिळाले हाेते. त्यापैकी १३ प्राथमिक आणि २ माध्यमिक शिक्षकांची पुरस्कारासाठी निवड झाली आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात केलेल्या कामगिरीला गुणदान करून सर्वाधिक गुण असलेल्या शिक्षकांची पुरस्कारासाठी निवड करण्यात येते़. तालुक्यात चांगले काम करणाऱ्या शिक्षकाने अर्ज केल्यानंतर इतर शिक्षक प्रस्तावच सादर करीत नसल्याचे चित्र आहे़.
आदर्श जिल्हा पुरस्कारासाठी प्राथमिकच्या १३ शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. हा प्रस्ताव आता विभागीय आयुक्तांकडे पाठवण्यात आला आहे. गत तीन वर्षांपासूनचे पुरस्कार केवळ जाहीर झाले आहे. तिन्ही वर्षांचे पुरस्कार वितरित करण्याचे नियाेजन आहे़. येत्या काही दिवसांत एक कार्यक्रम आयाेजित करून पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे़.
सचिन जगताप, शिक्षणाधिकारी, प्राथमिक, बुलडाणा.