बुलढाणा :
प्रतिबंधीत असलेल्या गुटख्यांची वाहतूक करणाऱ्या एकास अटक करुन त्याच्याकडील ८ लाखाचा गुटखा आणि इतर साहित्य असा १८ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई ८ सप्टेंबर रोजी सकाळी बुलढाणा-अजिंठा रोडवरील देऊळघाट नजिक करण्यात आली.
प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची विक्री जिल्ह्यात सुरु असून, गुटख्याची वाहतूक आणि विक्री करणाऱ्यांच्या मागावर पोलीस आहेत. अशातच ८ सप्टेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पथकाने बुलढाणा-अजिंठा रोडवरील देऊळघाट नजिक सापळा रचून वाहन क्रमांक एमएच-२८-८८१६ या मालवाहू वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये विविध कंपनीचा ८ लाख २९ हजार ४४० रुपयांचा गुटखा आढळून आला.
याप्रकरणी शेख सलीम शेख इस्माईल (५४,रा.चिखली)यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. एलसीबीच्या पथकाने आरोपीकडून १० हजार रुपये किंमतीचा मोबाइल आणि १० लाख रुपये किंमतीचे वाहन असा एकुण १८ लाख ३९ हजार ४४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बळीराम गिते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मनिष गावंडे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी केली आहे.
चिखली गुटखा विक्रीचे केंद्रकारवाईतील आरोपी हा चिखली येथील रहिवासी असून, चिखलीतील गुटखा किंगमध्ये त्याचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. चिखलीत प्रतिबंधित असलेला गुटख्याची मोठ्या प्रमाणात विक्री होत असून, गुटखा विक्रीतील मोठे मासे पकडण्याची गरज आहे.