खामगाव: अवैध गुटख्याची चोरट्याची वाहतूक होत असल्याच्या गुप्त माहितीवरून उपविभागीय अधिकारी पथकाने सोमवारी उशीरा रात्री छापा मारला. या कारवाईत ८१ हजार रुपयांच्या प्रतिबंधित गुटख्यासह एक दुचाकी, कार आणि तत्सम साहित्य असा एकुण ४ लक्ष २२ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी पथकाचे पो.ना.सुधाकर थोरात यांनी हिवरखेड पोलीसांत दिलेल्या तक्रारीत नमूद केले की, अवैध गुटख्याची चोरी छुपे वाहतूक होत असल्याच्या गुप्त माहिती मिळाली. या माहितीची खात्री पटल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी पथकाने फत्तेपूर घाट, हनुमान मंदीर जवळ घाट हनुमान मंदिराजवळ सापळा कारवाई केली. यात सादीक खान बिस्मिला खान ३७, रा. लाखनवाडा, राष्ट्रपाल निरंजन वानखेडे ३३, रा. आंबेटाकळी यांना दोघांना ताब्यात घेण्यात आले.
सादीक खान याच्या जवळून ७४, हजार ५५० रुपयांचा पान मसाला, गुटखा आणि तंबाखू जन्य साहित्य जप्त करण्यात आले. त्याचवेळी एमएच २८ व्ही ४५०८ ही तीन लाख रुपये किंमतीची जुनी कार जप्त करण्यात आली. तर राष्ट्रपाल वानखेडे याच्याकडून ७१५० रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आणि चाळीस हजार रूपये किंमतीची एम एच २८ ए एल ७८३९ ही दुचाकी जप्त करण्यात आली. दोन्ही आरोपींकडून एकत्रित ८१ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद केले. या तक्रारीवरून उपरोक्त आरोपींविरोधात भादंवि कलम ३२८, १८८, २७२, २७३, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास हिवरखेड पोलीस स्टेशनचे स.फो. आनंदा वाघमारे करीत आहेत.
प्रतिबंधित गुटख्याची खामगावातून वाहतूक
प्रतिबंधित गुटख्याची खामगाव शहरातून सर्रास वाहतूक केली जात आहे. खामगाव येथून चिखली, दे. राजा आणि बुलढाणा येथे गुटखा पोहोचविल्या जात आहे. यापूर्वीही बुलढाणा पोलीसांनी खामगाव येथील चांदमारीतील एका आरोपीला अटक केली. त्याच्या जवळून गुटखा साठा जप्त केला होता. सुत्रधारावर कोणतीही कारवाई होत नसल्याने, गुटखा तस्करीत वाढ होत असल्याची चर्चा आहे.