खामगाव (बुलढाणा) : शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा एका वाहनात घेऊन जात असताना, पाेलिसांच्या पथकाने चारचाकी वाहन आणि त्यातील १ लाख ८५ हजार रुपयांचा गुटखा जप्त केला. ही कारवाई शनिवारी रात्री उशिरा केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंकज धरमदास मीरचंदानी हा जुनी कार क्रमांक एमएच-०६, बीयू-९६२९ मध्ये प्रतिबंधित गुटखा घेऊन जात होता. दरम्यान, पथकाने छापा टाकला. यावेळी कारमधून केसरयुक्त पानमसाला गुटख्याच्या पुड्या असलेले ५२, अशा एकूण ४ पोतड्या, तसेच तंबाखू लिहिलेल्या पुड्या असलेले ५२ पुडे असलेल्या ३ पोतड्या, सुंगधित तंबाखूच्या पुड्या असलेल्या ४ पोतड्या, केसरयुक्त पानमसाला पुड्या असलेल्या ४ पोतड्या, असा एकूण त्याच्या ताब्यामध्ये गुटखा पानमसाला व सुगंधित तंबाखूचा एकूण १ लाख ८५ हजार १२१ रुपयांचा मुद्देमाल व चारचाकीची किंमत ३ लाख रुपये असा ४ लाख ८५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोहेकॉ. सुधाकर थोरात यांच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोउपनि राजेश गोमासे करीत आहेत.