नुकसानाचे संयुक्त पंचनामे सुरू
दुसरबीड : केशव शिवनी गावामध्ये १८ फेब्रुवारी रोजी वादळी वाऱ्यासह गारपीट व पाऊस झाला हाेता. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या शेतात उभे असलेले पीक होत्याचे नव्हते झाले. या नुकसानीचे संयुक्त पंचनामे करण्यात येत आहेत. सिंदखेडराजा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाचे कृषी सहायक केशव शिवणी गावचे कृषी सहायक पूजा खरात, कोतवाल मदन वायाळ यांनी पंचनामा केला.
कांदा उत्पादनात वाढ होण्याची शक्यता
धामणगाव बढे : कांद्याचे दर वाढल्याने अनेक शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील कांद्याची लागवड केली आहे. सध्या रब्बी हंगामातील गहू, हरबरा, ज्वारी या पिकांना थंडीचा फायदा होत आहे. त्यात कांदा उत्पादनातही वाढ होण्याची शक्यता कृषी विज्ञान केंद्राकडून वर्तविण्यात आली आहे.
भाजीपाला उत्पादक शेतकरी संकटात
बिबी : परिसरात १८ फेब्रुवारी झालेल्या वादळी पावसामुळे रब्बी पिकांसह भाजपाल्याचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यातच आठवडी बाजारही बंद ठेवण्यात येत असल्याने भाजीपाल्याला भाव मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे शासनाने भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी हाेत आहे.
धुळीमुळे रब्बीचे उत्पादन घटणार
धाड : बुलडाणा ते धाड रस्त्याचे काम गत काही दिवसांपासून संथ गतीने सरू आहे. या रस्त्यावर माेठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. धुळीमुळे रस्त्याच्या बाजूला असलेल्या शेतातील रब्बी पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान हाेत असून, उत्पादन घटण्याची शक्यता आहे.
नगरपंचायतीची मतदार यादी प्रसिद्ध हाेणार
माेताळा : नगरपंचायतीच्या प्रभागांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यावर हरकती मागविण्यात आल्या असून, १ मार्च राेजी अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. दरम्यान, प्रारूप यादीवर माेठ्या प्रामाणात हरकती नाेंदविण्यात आल्या आहेत.
बामखेड रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी
सिंदखेडराजा : बामखेड, आसोला रस्त्याची दुरवस्था झाली आहे. येथील बसस्टँडलगत असलेला बामखेड, आसोला रस्ता तत्काळ दुरुस्त करावा, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. याविषयी निवेदन देण्यात आले.
माजी सैनिकांना जुनी पेन्शन लागू करा
बुलडाणा : राज्याच्या सेवेत असलेल्या माजी सैनिकांना शासनाने जुनी पेन्शन लागू करावी, तसेच कालबद्ध पदाेन्नतीसह प्रलंबित मागण्यांसाठी शासनाकडे पाठपुरावा केल्याचे राज्याध्यक्ष चंद्रशेखर आलेगावकर यांनी सांगेतले.
लोंबकळलेल्या विद्युत तारांमुळे अपघाताची शक्यता
हिवरा आश्रमः येथील विद्युत सबस्टेशनच्या बाजूला लागून असलेल्या परिसरात गेल्या आठ महिन्यांपासून विद्युत प्रवाहित तारा लोंबकळल्या आहेत. यामुळे जीवितहानीचा धोका नाकारता येत नाही. या ठिकाणी विद्युततारा जमिनीपासून ७ फुटांपर्यंत लोंबकळल्या आहेत.
कोरोना कळातील वीजबिल माफ करा
बुलडाणा : कोरोना काळातील वीजबिल माफ करून शासनाने दिलेला शब्द पाळावा, अन्यथा विदर्भातून मुंबईला जाणाऱ्या वीज वितरण कंपनीचे मनोरे खांब तोडू, असा इशारा स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी दिला.
अमडापूरच्या मुलींचे शूटिंग बाॅल स्पर्धेत यश
अमडापूर : गाझियाबाद येथे ३९व्या राष्ट्रीय शूटिंग बाॅल स्पर्धेचे आयोजन शूटिंग बाॅल असोशियन ऑफ उत्तर प्रदेश यांच्या वतीने १२ ते १४ फेब्रुवारीदरम्यान करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी अमडापूर येथील ज्युनियर मुलींचा आठ सदस्यीय संघ सहभागी झाला होता. अमडापूरच्या या संघाचे यश प्राप्त केले आहे.