बीबी : मांडवा व बिबी मंडळात गुरुवारी सायंकाळी जाेरदार पाऊस झाला. काही ठिकाणी गारपीट झाल्याने गहू़, हरभरा, कांदा, टमाटर, बटाटे, टरबूज पिकाचे नुकसान झाले. परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानातून सावरत असलेल्या शेतकऱ्यांना आणखी एक धक्का बसला आहे. नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून तातडीने मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
आधीच खरिपाच्या पिकाचे नुकसान झाले आहे. त्या पाठोपाठ शेतकऱ्यांनी कसेबसे रबीचे पीक पेरले. तेही अवकाळी पावसाने जमीनदोस्त करून टाकले आहे. त्यामुळे बळीराजा धास्तावून गेला असून मदतीची अपेक्षा करीत आहे.
बिबी, मांडवा परिसरात शेतकऱ्यांचे गहू, हरभरा पीक सोंगणीला आलेले आहे. गारपिटीमुळे गहू, हरभरा पिकाचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी वेगवेगळी पिके घेत आहेत. बिबी, मांडवा महसूल मंडळात बटाटे, टमाटर, टरबूज, खरबूज, कांदा, भाजीपाला पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. नुकसानीसंदर्भात पंचनामे करून तात्काळ शेतकऱ्याला मदत मिळावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
वादळी वाऱ्यासह अवकाळी गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. कर्मचाऱ्यांना नुकसानाचे पंचनामे करायला सांगितले आहे.
हेमंत पाटील, नायब तहसीलदार, लोणार
काही दिवसातच काढणीला येणाऱ्या गहू, हरभऱ्यांचे माेठ्या प्रमाणात नुकसान हाेत आहे. टाेमॅटाे, टरबूज, बटाटे आदी पिकातून कमीत कमी तीन लाख रुपये उत्पन्न मिळेल अशी आशा होती. मात्र अवकाळी गारपिटीमुळे सर्व जमीनदोस्त झाले आहेत. त्यामुळे आर्थिक बजेट कोलमडणार असून बियाणे खते औषधाचा खर्च द्यायचा कोठून याची चिंता लागली आहे. तरी शासनाने तात्काळ पंचनामे करून मदत द्यावी.
मधुकर मोहिते, शेतकरी, मांडवा