सदानंद सिरसाट, खामगाव, बुलढाणा: गेल्या दोन-तीन दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी पाऊस, वादळी वाऱ््याने थैमान घातले आहे. शनिवारी दिवस आणि रात्री पडलेल्या पावसाचा पिकांना चांगलाच फटका बसला आहे. घाटाखालील चार तालुक्यातील ८८ गावातील २१०८ हेक्टरवरील गहू, हरभरा, कांदा, फळ, भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. जिल्ह्यात मलकापूर तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले. मलकापूर तालुक्यातील ३१ गावातील १३५८ हेक्टर क्षेत्र अवकाळी पाऊस व गारपीटीने बाधित झाले. त्यापाठोपाठ खामगाव तालुक्यातील २५ गावातील ४६९ हेक्टर क्षेत्रातील पिकाचे नुकसान झाले.
जळगाव जामोद तालुक्यातील ११ आणि संग्रामपूर तालुक्यातील २१ गावांत अनुक्रमे १४६ आणि १३५ हेक्टरमधील गहू , हरबरा, आंबा, कांदा या पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज कृषी विभागाने प्राथमिक अहवालात व्यक्त केला आहे. सोबतच मेहकर तालुक्यातील ३ गावातील २२२ हेक्टर, चिखली तालुक्यातील ५ गावांतील ४१ हेक्टरील पिकांचे नुकसान झाले आहे.
खामगाव तालुक्यातील चिंचपूर, लाखनवाडा, पिंप्री (कोरडे), काळेगाव, कोंटी या गावांना गारपिटीचा फटका बसला. गारपिटीमुळे शेतातील पीक जमीनदोस्त झाली. फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर बोरी- अडगाव, शहापूर आंबेटाकळी, बोथाकाजी, पळशी या परिसरात १८ मार्च रोजी मध्यरात्री तसेच रविवारी दुपारनंतरही अवकाळी पाऊस झाल्याने पिकांचे नुकसान झाले. गहू ,कांदा ,हरभरा, मका, संत्री, यासह इतर पिकांचे नुकसान झाले. मागील वर्षी पावसाळा पुरेसा झाल्याने धरण, विहिरीना पुरेसे पाणी उपलब्ध आहे. याचा फायदा घेत शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उन्हाळी व रब्बी पिकांची पेरणी केली होती. त्यानंतर गहू, हरभरा हे पिके काढणीला आले. मात्र, आता हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेते की काय, अशी भीती शेतकऱ्यांना आहे.