कोविडमधून बरे झालेल्या अनेक रुग्णांना गंभीर आजारांना सामोरे जावे लागत आहे. पोस्ट कोविडच्या रुग्णांमध्ये अशाच विविध समस्यांपैकी एक समस्या ही केस गळतीची दिसून येत आहे. कोरोनातून बरे झाल्यानंतर साधारणत: तीन महिन्यांनंतर ही समस्या उद्भवताना दिसून येत आहे. केस गळण्यास सुरुवात झाल्यानंतर पुढील सहा महिन्यांत गेलेले केस पुन्हा येऊ लागतात. एकंदरीत ही प्रक्रिया साधारणत: एक महिन्यापर्यंत सुरू राहते. त्यामुळे रुग्णांनी तणावात न येता सकस आहार आणि पुरेशी झोप घ्यावी, असा सल्ला डॉक्टर देत आहेत.
कोविडनंतर तीन महिन्यांनी गळू लागतात केस
आजारादरम्यान विविध औषधांचा मारा आणि त्यामुळे येणारा ताण यामुळे शरीरात विविध बदल घडू लागतात. त्यामुळे आजार होऊन गेल्यानंतर तीन महिन्यांनंतर केस गळण्यास सुरुवात होत असल्याची माहिती तज्ज्ञ डॉक्टर देतात.
हे करा...
आजारातून बरे झाल्यानंतर रुग्णांनी सकस आहार घेणे गरजेचे आहे.
रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी सकर आहारासोबतच पुरेशी झोपही घेणे गरजेचे आहे.
डोक्यात कोंडा झाला असेल, तर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच शांपू घ्यावा.
डस्ट पोल्युशन झाल्यास शांपू, हेअर ऑईलचा नियमित वापर करणे गरजेचे आहे.
तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानंतरच करा घरगुती उपाय
आजारापासून बरे झाल्यांनतर केस गळण्याचे प्रमाण वाढू लागल्याने अनेक जण तणावात येतात. त्यामुळे केस गळण्याचे प्रमाण आणखी वाढू लागते.
यापासून बचावासाठी बहुतांश लोक इतरांच्या सल्ल्याने विविध घरगुती उपाय करण्यास सुरुवात करतात. मात्र, काहींना त्याचे दुष्परिणामही दिसू लागतात.
असे होऊ नये म्हणून तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घरगुती उपाय करावा, जेणेकरून संभाव्य धोका टाळणे शक्य होईल.