लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : शहरातील दोन मुख्य रस्त्यांच्या कामाला मोठ्या प्रतीक्षेनंतर मुहूर्त मिळाला आहे. त्यामुळे आता या खड्डेमय रस्त्यांपासून शहरवासियांची सुटका होणार आहे. परंतु, संगम चौक ते तहसील चौकात जाणाऱ्या रस्त्याचे काम अर्धे सिमेंट आणि अर्धे डांबरीकरण असे करण्यात येत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. मात्र, कसे का होईना, पण एकदाचे रस्त्याचे काम होत असल्याचे मत नागरिकांमधून व्यक्त होत आहे.बुलडाणा शहर हे जिल्ह्याचे ठिकाण असूनही येथील मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. येथील संगम चौकातून तहसील चौकात जाणाऱ्या रस्त्याचे काम अनेक दिवसांपासून सुरू करण्यात आले होते. या रस्त्याची वर्षभरापूर्वी मोठी दुरवस्था झाली होती. दरम्यान, या रस्त्याचे काम होत असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला होता. सुरूवातीला सिमेंट रस्त्याचे काम करून नंतर हे काम थांबविण्यात आले होते. यासाठी खोदण्यात आलेल्या मार्गावरून वाहन चालविणे अवघड बनले होते. त्यानंतर अर्ध्या रस्त्यावर खडीकरण आणि अर्ध्या रस्त्यावर सिमेंट टाकण्यात आले होते. पावसाळा सुरु झाल्यानंतर हे काम बंद झाले. संथगतीने रस्त्यांची कामे होत असल्याने वाहनचालक त्रस्त झाले होते. आता दोन दिवसांपासून खडीकरण झालेल्या अर्ध्या रस्त्यावर डांबरीकरण करण्यात येत आहे. यातील रस्त्याचा काही भाग सिमेंटचा आहे, तर काही भागाचे डांबरीकरण करण्यात येत असल्याने नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त होत आहे.
बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोरील रस्त्याचे काम सुरु
बसस्थानक ते चिंचोले चौक या रस्त्यावर अनेक दिवसांपासून खड्डे पडले होते. त्यामुळे या रस्त्याने वाहन चालवताना चालकांना कसरत करावी लागत होती. या रस्त्यावर बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोरच पाऊस येताच पाणी साचत होते. त्यामुळे या कार्यालयासमोरुन वाहन नेणे अवघड होत होते. अखेर बसस्थानक ते गजानन महाराज मंदिरापर्यंत सिमेंट रस्त्याचे काम सुरू झाल्याने नागरिकांची खड्ड्यांपासून सुटका झाली आहे.