जळगाव जामोद : तालुक्यातील पळशी वैद्य येथील मूळ निवासी तथा विधी व न्याय विभागाचे माजी माजी प्रधान सचिव ॲड.हमीद बापूमिया पटेल यांची महाराष्ट्र शासनाने इतर मागास वर्ग समर्पित आयोगाच्या सदस्यपदी नियुक्ती केली आहे.यामुळे जळगाव जामोद तालुक्यासह बुलढाणा जिल्ह्याच्या सन्मानात भर पडली आहे. राज्यातील नागरिकांच्या मागास वर्गाच्या (इतरमागास वर्गाच्या) बाबतीत स्थानिक स्वराज्य संस्था निहाय राजकीय मागासलेपणाच्या स्वरूपाची व परिणामांची समकालीन अनुभवाधिष्ठित सखोल चौकशी करण्यासाठी समर्पित आयोग स्थापन करण्यात आला असून माजी मुख्य सचिव जयंतकुमार बाठिया हे या आयोगाचे अध्यक्ष असतील या आयोगामध्ये सात सदस्य असून ॲड. हमिद पटेल यांच्याशिवाय सेवानिवृत्त आयएएस अधिकारी महेश झगडे व नरेश गीते हे सदस्य असतील तर मत्सव्यवसाय विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक पंकजकुमार हे सदस्य सचिव असतील तसेच आंतरराष्ट्रीय जनसंख्या विज्ञान संस्था व टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचे संचालक किंवा त्यांचे प्रतिनिधी हे या आयोगाच्या सदस्य असतील. हमीद पटेल यांनी यापूर्वी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सदस्यपद भूषविले असून विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव असताना त्यांनी बॉम्बे पोलीस ऍक्ट ऐवजी महाराष्ट्र पोलीस कायदा २०१४ चा मसुदा तयार केला होता.सर्वोच्च न्यायालयाने तो मान्य करीत असा कायदा सर्व राज्यात असण्याची गरज प्रतिपादित केली होती. तसेच लोकसेवा आयोगाचे सदस्य असतांना अँड. हमीद पटेल यांनी उत्तीर्ण उमेदवारांना प्रत्यक्ष मुलाखती करता मुंबईला न बोलाविता विभागनिहाय मुलाखती घेण्याचे नियोजन केले होते.तीच पद्धती सध्या राज्यात सुरू आहे.इतर मागासवर्ग समर्पित आयोगाच्या माध्यमातून इतर मागासवर्गीयांना राजकीय आरक्षण देण्याबाबत योग्य ती माहिती गोळा करून तसा अहवाल शासनाकडे सादर केला जाईल असे पटेल यांनी सांगितले.
हमिद पटेल इतर मागासवर्ग समर्पित आयोगाच्या सदस्यपदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2022 5:59 PM