अकोला: कौलखेड परिसरातील बंजारा नगरमधील निर्माणाधीन मंदिरासह दक्षिण झोनमधील चार धार्मिक स्थळांवर महापालिकेने हातोडा चालविला. एकाच दिवशी चार धार्मिक स्थळांना जमीनदोस्त करण्यात आले. महापालिका क्षेत्रात खासगी जागांसह सार्वजनिक जागा, ओपन स्पेस व मुख्य रस्त्यांलगत धार्मिक स्थळांची उभारणी करण्यात आली. रस्त्यांच्या मध्ये धार्मिक स्थळांची उभारणी झाल्याने रस्त्यांच्या विकास कामांना अडथळा निर्माण होत आहे. शिवाय, चौकाचौकांमध्ये पुज्यनीय व्यक्त ींचे पुतळे, प्रतिमा लावण्यात आल्या असून, त्यांची कोणतीही सुरक्षा व्यवस्था नाही. या सर्व बाबी लक्षात घेता सर्वोच्च न्यायालयाने धार्मिक स्थळे हटवण्याचे आदेश दिले आहेत. धार्मिक स्थळे हटविण्याच्या कारवाईचा अहवाल प्रत्येक महिन्याला उच्च न्यायालयात सादर करण्याचे निर्देश आहेत. त्यानुषंगाने महापालिका आयुक्तांनी शहरात २00९ नंतर उभारलेल्या ५६ धार्मिक स्थळांची यादी तयार केली. चारही क्षेत्रीय अधिकार्यांना संबंधित धार्मिक स्थळे हटवण्याचे आदेश दिले. सोमवारी दक्षिण झोनचे क्षेत्रीय अधिकारी कैलास पुंडे यांनी दक्षिण झोन अंतर्गत येणार्या कौलखेड परिसरातील बंजारा नगरमधील निर्माणाधीन मंदिर पाडले. आजवरच्या कारवाईत हे सर्वात मोठे मंदिर होते. या परिसरातील आणखी एक धार्मिक स्थळ हटवल्यानंतर खंडेलवाल नगर, गौरक्षण रोड परिसरातील शासकीय जागेवर उभारलेले स्थळ,सिंधी कॅम्प,पक्की खोलीनजीकच्या झुलेलाल भवनमागील एका धार्मिक स्थळाला हटवण्याची कारवाई करण्यात आली. मनपाने दक्षिण झोनमध्ये एकाच दिवशी चार ठिकाणी कारवाई केल्यामुळे अनेकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. झोन अधिकारी कैलास पुंडे, खदान पोलीस ठाण्याचे ठाणेदार सी.टी.इंगळे यांच्या उपस्थितीत अतिक्रमण अधिकारी विष्णू डोंगरे, नगर रचना विभागाचे राजेंद्र टापरे, संजय थोरात, प्रवीण मिश्रा, आरोग्य निरीक्षक रूपेश मिश्रा आदींसह मनपा कर्मचार्यांनी कारवाई केली.
दक्षिण झोनमध्ये धार्मिक स्थळांवर हातोडा
By admin | Published: February 09, 2016 2:24 AM