खामगाव: शहरातील मुख्य रस्त्यासोबतच बाजारातील अतिक्रमण हटविण्यासाठी पालिका प्रशासनाकडून कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत आहेत. या कारवाई दरम्यान, सुरक्षा व्यवस्था म्हणून शहर पोलिसांकडे बंदोबस्ताची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात पालिका प्रशासनाने शहर पोलिस स्टेशनच्या निरिक्षकांना पत्र दिल्याची माहिती समोर येत आहे.
शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण निमूर्लनासाठी जिल्हाधिकारी स्तरावरून पालिका प्रशासनाचे कान टोचले जात आहे. शहरातील अतिक्रमणाची समस्या गंभीर होण्यापूर्वीच मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण निमूर्लन करावे, मुख्य रस्त्यांचा श्वास मोकळा करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. मात्र, तरी देखील पालिका प्रशासनाकडून अपुऱ्या मनुष्यबळामुळे अतिक्रमण निमूर्लनाकडे चालढकल केली जात होती. दरम्यान, आता पुन्हा वरिष्ठ स्तरावरून अतिक्रमण निर्मूलनासाठी प्रभावी उपाययोजना करण्याचे स्पष्ट निर्देश मिळाल्याने, शहरातील अतिक्रमण काढण्यासाठी पालिका प्रशासनाच्यावतीने मोहिम हाती घेण्यात येणार आहे. पोलिस बंदोबस्त मिळताच शहरातील मुख्य रस्त्यासोबतच बाजारपेठेतील अतिक्रमण हटविण्यात येणार असल्याची माहिती आहे.
असा हवाय पोलिस बंदोबस्त!
शहरात अतिक्रमण निमूर्लन मोहिम राबविताना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची खबरदारी पालिका प्रशासनाच्यावतीने घेण्यात येत आहे. त्याअनुषंगाने पोलिस उप निरिक्षक-०१, पोलिस कॉन्स्टेबल-०५, महिला कॉन्स्टेबल-०२ अशा पोलिस पथकाची मागणी पालिका प्रशासनाकडून करण्यात आली आहे.
पालिका प्रशासनाकडून पोलिस बंदोबस्ताची मागणी करण्यात आली आहे. पोलिस बंदोबस्तासाठी शहर पोलिसांशी पत्र व्यवहार करण्यात आला आहे. पोलिस बंदोबस्त मिळताच अतिक्रमण निमूर्लन मोहिम राबविण्यास प्रारंभ केला जाईल.
- धनंजय बोरीकर, मुख्याधिकारी, नगर परिषद, खामगाव.
शहरात अतिक्रमण निमूर्लन मोहिम राबविण्यासाठी पोलिस बंदोबस्त हवा असल्याची मागणी पालिकेने केली आहे. या संदर्भात पालिकेचे पत्र प्राप्त झाले आहे. ८ जणांच्या पथकाची मागणी पालिकेने केली आहे.
- संतोष टाले, पोलिस निरिक्षक, शहर पोलिस स्टेशन, खामगाव.