बुलडाणा : स्वस्त कर्जापासून ते लाॅटरी लागल्यापर्यंत विविध आमिषे दाखवून सायबर गुन्हेगार सर्वसामान्यांची फसवणूक करीत असल्याचे चित्र आहे. गत काही वर्षांत ऑनलाईन फसवणुकीच्या घटना वाढल्याने सर्वसामान्यांनी सावध राहण्याचे आवाहन सायबर सेलच्या वतीने करण्यात आले आहे.
काेराेनाच्या काळात लाॅकडाऊन करण्यात आल्याने सर्वसामान्यांचा इंटरनेटचा वापर वाढला आहे. यामध्ये समाज माध्यमांचा सर्वाधिक वापर हाेत असताना त्याचा काही जण दुरुपयाेग करून सर्वसामान्यांची फसवणूक करीत असल्याचे चित्र आहे. सन २०१६ पासून तर अशा घटनांमध्ये वाढच झाली आहे.
लाॅटरी लागल्याचे आमिष, स्वस्त कर्ज, नाेकरी व इतर आमिष दाखवून फसवणूक करण्यात येत आहे. सायबर सेलच्या वतीने वेळाेवेळी सर्वसामान्यांची जनजागृती करण्यात येत आहे. प्रत्येकवेळी सायबर गुन्हेगार वेगवेगळे आमिष दाखवत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य लाेकांनी अनाेळखी क्रमांकावरून आलेल्या एसएमएस किंवा लिंकला प्रतिसाद देऊ नये, असे आवाहन सायबर सेलने केले आहे.
केवायसी किंवा विविध आमिष दाखवून तुम्हाला बँक खात्याची माहिती मागितली तर देऊ नका़ सध्या ऑनलाइन फसवणुकीचे विविध प्रकार वाढले आहेत़ त्यामुळे नागरिकांनी सावध रहावे़ फसवणूक झाल्यास तत्काळ पाेलीस ठाण्यात तक्रार करावी.
अनिल बेहरानी, पाेलीस निरीक्षक, सायबर सेल, बुलडाणा