लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : तुमची केवायसी पेंडिंग आहे, तुमचे सिम व्हेरिफिकेशन करायचे आहे, असा काॅल आल्यास सावधान! अशा काॅलवरून तुमची ऑनलाइन फसवणूक हाेण्याची शक्यता आहे. त्यामुळे, अशा सायबर गुन्हेगारांपासून सावध राहण्याची गरज आहे. आतापर्यंत अनेकजणांची फसवणूक झाली आहे. सायबर गुन्हेगार विविध कारणे सांगून बँक खाते, एटीएम, क्रेडिट कार्डची माहिती मागतात. अशी माहिती दिल्यास तुमच्या खात्यातील रक्कम परस्पर काढून घेतात. त्यामुळे, सायबर गुन्हेगारांपासून सर्वसामान्य नागरिकांनी सावध राहण्याची गरज आहे. नवे-नवे शाेध लावून लाेकांची फसवणूक करण्यात येत आहे.
अशी होऊ शकते फसवणूक
हाॅटेलचालकाला गंडा
आम्ही फाैजी असून ५० लाेक तुमच्या हाॅटेलमध्ये जेवण करायला येणार आहोत. त्यासाठी तुमच्या फाेन पेवर पैसे पाठवायचे असल्याने बँक मॅनेजरशी बाेला, असे सांगून एका ताेतया मॅनेजरने बँकेच्या खात्याची माहिती घेऊन एका हाॅटेल संचालकाला गंडा घातल्याची घटना उघडकीस आली.
दुकानदाराची फसवणूक
शहरातील एका दुकानदाराच्या दुकानातील साहित्य व्हाॅटस्ॲपवरून काही लाेकांनी पसंत केले. त्यानंतर पैसे पाठवायचे असल्याने एक ॲप डाउनलाेड करायला लावले. पैसे पाठविल्यानंतर तुम्हाला ते रिफंड मिळतील, असे सांगितले. पैसे टाकल्यानंतर ते परत मिळालेच नाहीत.
कस्टमर केअर नंबर सर्च करणे पडले महागात
ऑनलाइन खरेदीची ऑर्डर रद्द करण्यासाठी अनेकजण गुगलवर कस्टमर केअर क्रमांक सर्च करतात. अशा क्रमांकाच्या माध्यमातून शेगावातील एका विद्यार्थ्याची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली.
गेलेला पैसा परत मिळणे कठीण
ऑनलाईन फसवणूक झाल्याच्या काही तासांतच तक्रार केल्यास पैसे मिळण्याची शक्यता असते. त्यानंतर मात्र पैसे परत मिळणे कठीण असते. अनेक वेळा परराज्यांतील गुन्हेगार असल्याने तेथील पाेलीस सहकार्य करीत नसल्याने तपासात अडथळे येतात.
बँकेतून काॅल करून केवायसीची माहिती विचारली जात नाही. त्यामुळे, अशी माहिती कुणालाही देऊ नये. तसेच अनाेळखी ॲप डाउनलाेड करू नये. काॅल आल्यास प्रतिसाद देऊ नये.
- प्रदीप ठाकूर, पाेलीस निरीक्षक