चिखली (जि. बुलडाणा): तालुक्यातील इसोली येथील शेतकरी नितीन शेळके यांच्या सूरज नामक पाच वर्षीय चिमुकल्याला अन्ननलिका व हृदयाचा आजार असून, या दोन्ही आजारांवर दोन वेगवेगळय़ा शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याचा निर्वाळा डॉक्टरांनी दिला; मात्र घरची परिस्थिती बेताचीच असल्याने नितीन शेळके यांना मुलाच्या शस्त्रक्रियेचा खर्च शक्य नसल्यामुळे पंचायत समिती सभापती सत्यभामाताई डहाके व परिसरातील सामाजिक कार्यकर्ते आर्थिक मदतीसाठी सरसावले असून, ५0 हजार रुपयांची मदतदेखील उभी केली आहे. शस्त्रक्रियेसाठी आणखी निधीची आवश्यकता असल्याने दानशूरांनी पुढे यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. इसोली येथील नितीन शेळके यांच्या सूरज या पाच वर्षीय मुलाला अन्ननलिका व हृदयाचा आजार असल्याने गत तीन वर्षापासून त्याच्यावर मुंबई येथील केईएम, जेजे रुग्णालयासह नाशिक, हैद्राबाद, रायपूर व शिर्डीसह विविध ठिकाणच्या रुग्णालयांमध्ये उपचार केले गेले. दरम्यान, वर्धा येथील दत्ता मोघे वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या रुग्णालयातील निदानावरून सूरजच्या अन्ननलिकेसह हृदयाची शस्त्रक्रिया करणे आवश्यक झाले आहे; मात्र शेळके यांनी यापूर्वीच आपल्याकडील सर्व जमापुंजी मुलाच्या उपचारात खर्ची घातल्याने ते आता हतबल ठरले आहेत. मुलाच्या दोन्ही शस्त्रक्रियेसाठी सुमारे चार लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. त्यापैकी दीड लाख रुपये राजीव गांधी जीवनदायी योजनेतून मिळणार आहे; मात्र उर्वरित रक्कम आणायची कोठून, अशा विवंचनेत असलेल्या शेळके यांच्या मदतीसाठी पंचायत समिती सभापती सत्यभामाताई डहाके, सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र खपके, समाधान सुपेकर, ङ्म्रीराम घोरपडे यांनी पुढाकार घेवून आतापर्यंत सुमारे ५0 हजार रुपयांची मदत पुरविली आहे. अनुराधा मिशनदेखील शस्त्रक्रियेदरम्यान आवश्यक असलेला रक्तपुरवठा करण्यासाठी पुढे आली आहे. दरम्यान, युवक काँग्रेसचे जिल्हा महासचिव राम डहाके व त्यांच्या पत्नी पंचायत समिती सभापती सत्यभामा डहाके या दाम्पत्याने स्वत: रोख स्वरूपात मदत देऊन सामाजिक बांधीलकी जोपासली आहे. या रोख मदतीसह ग्रामस्थांनी दिलेल्या योगदानातून जमा झालेली रक्कम २५ सप्टेंबर रोजी शेळके यांना देण्यात आली.
हृदय शस्त्रक्रियेसाठी मदतीचा हात
By admin | Published: September 28, 2015 2:31 AM