शहरातील अष्टविनायकनगर भागात राहणाऱ्या हर्षा योगेश जाधव यांनी शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली की, त्यांचा विवाह योगेश साहेबराव जाधव यांच्यासोबत २५ फेब्रुवारी, २०१८ रोजी झाला होता. लग्नानंतर पती योगेश हा पीडितेसोबत पती-पत्नी या नात्याने वागत नव्हता. तेव्हा ही हकिकत सासरे साहेबराव जाधव, सासू अंकिता जाधव यांनाही सांगितली, परंतु त्यांनीही याकडे दुर्लक्ष केले. ‘तू व्यवस्थित वाग, नाहीतर जीवाने मारून टाकू,’ अशा धमक्या सासरा व सासू यांनी दिल्याचा आरोपी पीडितेने दिलेल्या तक्रारीत केला आहे, तर जेठ विनोद साहेबराव जाधव व त्यांची पत्नी वैष्णवी उर्फ गीता विनोद जाधव यांनीही पीडितेचा शारीरिक व मानसिक छळ केला. लग्न झाल्यानंतर पती व त्यांच्या नातेवाइकांनी हुंडा व मानपान, तसेच आंदण दिले नाही, असे म्हणून पती योगेश याला व्यवसाय करण्याकरिता माहेरवरून पाच लाख रुपये आण, याकरिता शारीरिक व मानसिक छळ केल्याची तक्रार पीडितेने केली आहे. यावरून पोलिसांनी सासरकडील पती योगेश साहेबराव जाधव, सासरे साहेबराव यशवंतराव जाधव, सासू अंकिता साहेबराव जाधव, विनोद साहेबराव जाधव, वैष्णवी विनोद जाधव, गणपत बापुराव गुळमकर या सहा जणांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.
माहेरावरून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा छळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 4:38 AM