- सोहम घाडगे
बुलडाणा : एकदा आपले ध्येय ठरवले की त्यामध्ये बेस्ट करायचे. प्रचंड मेहनत करायची. अपयश आले तरी मागे हटायचे नाही. जीवनात हा मूलमंत्र पाळल्यास यश मिळतेच. कैलास करवंदे, सतीशचंद्र भट, गिरीश पवार या त्रिमुर्तींचे मार्गदर्शन व माझ्यातील जिद्द यामुळेच इथपर्यंत येता आले, असे मत ‘शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त बॉक्सिंग खेळाडू अनंता चोपडे याने बोलताना व्यक्त केले.
बॉक्सर व्हायचे आहे, असे ठरविले होते का?
- बॉक्सर व्हायचे असे कधीच ठरवले नव्हते. सवणा येथील मार्गदर्शक कैलास करवंदे यांनी क्रीडा प्रबोधिनीचा मार्ग दाखवला. सर मैदानावर रनिंगची चाचणी घ्यायचे. सर्वांना बिस्किटचा पुडा द्यायचे. मी सुरुवातीला केवळ बिस्किटाच्या पुड्यासाठी धावायचो. मात्र चवथा वर्गात पुणे येथे क्रीडा प्रबोधिनीसाठी चाचणी दिली. निवड झाली आणि तेथूनच खरा मार्ग गवसला. पुढे बॉक्सिंग खेळाची निवड केली.
बॉक्सिंग खेळामधील तुझे आदर्श कोण आहेत?
- माझ्या वजनगटातील बॉक्सर अमित पंगाल याशिवाय मेरी कोम, विजेंदरसिंग हे माझे आदर्श आहेत. या खेळाडूंकडून खूप धडे मिळाले. मेरी कोम यांच्या मार्गदर्शनामुळे माझ्या खेळातील उणिवा दूर झाल्या. तांत्रिक पंचेस शिकविले. भविष्यातील स्पर्धांमध्ये याचा मला भरपूर फायदा होईल. मेरी कोम यांच्यासोबत भेटीची मिळालेली संधी आयुष्यात खूप महत्वाची आहे.
बॉक्सिंगमधील विजयाचा प्रवास कधीपासून सुरुवात झाला?
- आयुष्यातील पहिल्याच राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण पदक मिळाले. कोलकत्ता येथे ही स्पर्धा झाली होती. विजयाचा खरा प्रवास तिथून सुरु झाला. आतापर्यंत १४ राष्ट्रीय व ३ आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळलो. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत २ सुवर्ण पदक मिळविले आहे. यापुढे जागतिक स्पर्धा खेळायच्या आहेत. जिल्ह्याचे नाव मोठे करायचे आहे. बॉक्सिंगमध्ये नवे रेकॉर्ड नोंदवायचे आहेत. आई-वडील दुसºयांचा शेतात काम करतात. भाऊ आॅटो चालवितो.घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. तरीही कुटूंबियांनी खेळासाठी पूर्ण पाठींबा दिला. जमेल तेवढी आर्थिक मदत केली. माझ्यासाठी ती खूप मौल्यवान आहे. घरच्यांनी माझ्यासाठी घेतलेले कष्ट मी कधीच विसरु शकत नाही.
विदेशाच्या तुलनेत आपल्याकडील सुविधा कशा आहे ?
- विदेशातील खेळाडूंच्या तुलनेत आपल्याकडे मिळणाºया सुविधा कमी आहेत. मात्र तरीही भारतीय खेळाडू विदेशी खेळाडूंना मात देतात. आपल्या खेळाडूंमध्ये प्रचंड गुणवत्ता, जिद्द आहे. देशाच्या मातीतून विजयाची स्फूर्ती मिळते. सुविधा कमी असोत किंवा जास्त असो प्रतिस्पर्धीला हरवायचे एवढेच आपल्या खेळाडूंच्या डोक्यात असते. बºयाच अंशी ते यामध्ये यशस्वी होतात. बॉक्सिंगमध्ये रशिया, क्यूबाच्या खेळाडूंचे कडवे आव्हान असते.विदेशाप्रमाणे आपल्या खेळाडूंनाही चांगल्या व दर्जेदार सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत. भारत सरकारने याकडे ध्यान देण्याची गरज आहे. आपल्या खेळाडूंमधील जिद्द व गुणवत्तेला जगात तोड नाही.