- अर्जूनकुमार आंधळे
देऊळगावराजा : तालुक्यातील बहुचर्चित खडकपूर्णा पुल अद्यापही वर्षानुवर्षापासून कठड्याविनाच असून, यापुर्वी झालेल्या दोन मोठ्या दुर्घटनांकडे संबंधित विभागाने डोळेझाक केल्याने या पुलावर अपघाताची शक्यता वाढीस लागलेली आहे. देऊळगावराजा तालुक्यात देऊळगाव मही ते टाकरखेड भागिले दरम्यान खडकपूर्णा नदीवरचा पूल हा ब्रिटीश राजवटीत तयार करण्यात आला. पुर्वीच्या राज्य महामार्गावर व आताच्या नवीन रचनेत राष्ट्रीय महामार्गावर हा पूल आहे. या पुलावरुन नागपूर, अकोला, अमरावती, बुलडाणा, खामगाव, शेगाव, मलकापूर सह इंदोर (मध्यप्रदेश) तर दुसरीकडे जालना, औरंगाबाद, सांगली, बीड, नाशिक, पुणे, मुंबई शहराकडे एस.टी. बसेस, खाजगी बसेस व मालवाहू ट्रकची दररोज शेकडोंच्या संख्येने वाहतूक होत असते. खडकपूर्णा (संत चोखासागर) धरणाच्या निर्मितीमुळे पावसाळ्यात पुलावरुन पूर जात नाही. धरण बांधकामाच्या पुर्वी अनेकदा पावसाळ्यात या पुलावरुन पूर जात असल्याने दहा ते पंधरा तास वाहतूक ठप्प होत होती. अंदाजे ३५ ते ३८ वर्षापुर्वी याच पुलावरुन पूर वाहत असताना सोलापूरहून मलकापूरकडे जाणाºया बसच्या चालकाने प्रसंगावधान न राखता रस्ता पार केल्यावर पाण्याचा प्रवाह वाढल्याने व चालकाचे मनोधैर्य खचल्याने अखेर बस प्रवाशांसह पुरात वाहून गेली. यात बसच्या चालक-वाहकासह निष्पाप प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. तर दुसरी घटना याच पुलावर २५ वर्षापुर्वी घडली होती. चिखली ते देऊळगावराजा मार्गावर प्रवाशी वाहतूक करणारा मॅटेडोअर प्रवाशी घेऊन दे.राजाकडे येत असताना पुलावरुन पुराचे पाणी वाहत होते. मॅटेडोअरच्या चालकाच्या चुकीमुळे व पाण्याचा प्रवाह जोरात असल्याने मॅटेडोअर प्रवाशांसह पुरात कोसळला. या दुर्दैवी घटनेत ७ ते ८ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या दोन्ही घटनांमधून संबंधित विभागाने सतर्क होणे आवश्यक होते. मात्र तसे काहीच न झाल्याने पुल आहे त्याच स्थितीत आजही उभा आहे. नाही म्हणता या पुलाच्या बाजुला नवीन समांतर पुलाचे निर्माण अंदाजे ८ वर्षापुर्वी करण्यात आले. मात्र त्या पुलावरुन वाहतूक अद्यापही सुरू झालेली नाही. पुढे खामगाव ते जालना या रस्त्याचे चौपदरीकरण होणार असल्याने सध्याही ब्रिटीश राजवटीत तयार झालेल्या जुन्या पुलावरुनच वाहतूक सुरू आहे. या पुलावर सर्वात जास्त धोका देऊळगावराजाहून चिखलीकडे जाणाºया वाहनांना आहे. कारण या वाहनांच्या डाव्या बाजुला पुलाचा अंतीम भाग हा कठड्याविनाच आहे.