शासनाने जाहीर केल्यानुसार, शनिवारी आणि रविवारी लाॅकडाऊन पाळण्याचा निर्णय सर्व व्यापारी बांधवांनी घेतला आहे. साखरखेर्डा गावात दररोज कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण आढळून येत असल्याने चिंता वाढली आहे. त्यात परिसरातील २३ गावांतही रुग्ण आढळून आले आहेत, परंतु काही नागरिक आपला आजार लपवित असून, प्रत्येक वार्डात ५० पेक्षा अधिक रुग्ण आहेत. अशा प्रकारे कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण असल्याने, काही रुग्णांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे, तर काही रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यामुळे गावात कोरोनाने कहर केला असून, नागरिक कोणतीही सुरक्षितता पाळत नसल्याने आणखी रुग्णांची संख्या वाढू शकते. वाढती रुग्णसंख्या बघता, घरीच राहण्याचा सल्ला आरोग्य विभाग देत आहे. कोरोना पाॅझिटिव्ह आढळून आल्यानंतर, त्याची माहिती आरोग्य विभागाला दिली, तर संक्रमणाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मदत मिळू शकते, परंतु काही सुशिक्षित नागरिकच आजार लपवित असून, त्याचा प्रादुर्भाव इतर घरातही फैलावत आहे.
साखरखेर्डा येथे कोरोनाचा कहर, अनेक रुग्ण घेत आहेत खासगी उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 4:34 AM