किनगाव जट्टू : दाेन्ही पाय नसतानाही जगण्याची जिद्द आणि मेहनतीच्या बळावर किनगाव जट्टू येथील ३४ वर्षीय युवक स्वावलंबी जीवन जगत आहे़
किनगाव जट्टू येथील गजानन आश्रुबा कांबळे हा भूमिहीन असून आर्थिक परिस्थिती जेमतेम आहे़ परिवारातील सर्व सदस्य मोलमजुरी करून उदरनिर्वाह भागवितात़ गजानन दोन्ही पायाने दिव्यांग असून त्याला शासनाच्या वतीने तीन चाकी सायकलसुद्धा मिळालेली आहे़ ते सायकलचा आधार घेऊन जिद्द चिकाटी मेहनतीच्या बळावर त्यांचे कुटुंबाची उपजीविका भागविण्यासाठी ते स्वतः जंगलात जाऊन शिंदीच्या झाडाचे पनाळ आणतात. तसेच स्वतः झाडू बनवतात व विक्रीसुद्धा करतात़ कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाने येथील आठवडी बाजार बंद केला असल्यामुळे ते सकाळीच गावात सायकलीवर झाडू ठेवून विक्रीकरिता फेरी मारतात व आपल्या कुटुंबाची उपजीविका भागवतात़ दिव्यांग असूनही कुणावर ओझे न हाेता ते स्वावलंबी जीवन जगत आहे़ तसेच आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाहसुद्धा करीत आहेत़