लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : राज्यभरातील माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांची स्वतंत्र प्रोफाईल करण्याचे काम सध्या सुरू आहे. आॅनलाइनमुळे शाळांची सर्व माहिती एका क्लिकवर मिळणार आहे. जिल्ह्यातील सर्व प्राचार्य व मुख्यध्यापकांना १३ सप्टेंबर रोजी अमरावती येथील दोन अधिकाऱ्यांनी प्रशिक्षण दिले असून १४ सप्टेंबरपासून शाळांच्या प्रोफाईल बनविण्याच्या कामाला सुरूवात झाली आहे.माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयांची माहिती उपलब्ध होण्यास दरवर्षी अनेक अडचणी निर्माण होतात. अनेकदा जुनीच माहिती अपडेट करावी लागते. त्यामुळे राज्य मंडळाने दहावी व बारावी असलेल्या शाळांची प्रोफाईल तयार करण्याचा उपक्रम महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने हाती घेतला आहे. शाळांना सद्यस्थितीतील माहिती आॅनलाईन भरण्याच्या सुचना दिल्या आहेत. हे संपुर्ण काम ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण करावयाचे आहे.यासंदर्भात अमरावती येथील दोन अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील मुख्याध्यापकांना प्रशिक्षण ते प्रकल्पातील अडीअडचणी संदर्भात सविस्तर चर्चा केली. यातून शाळांचे आॅनलाईन प्रोफाईल बनविण्याचे काम आता सुरू झाले आहे. या माहितीमध्ये शाळेच्या इमारतीसंदर्भातही स्वतंत्र माहिती मागितली आहे. शाळांची सर्व माहिती आॅनलाईन भरण्यात येत असून त्यासाठी शाळांना लिंकसुद्धा देण्यात आली आहे. त्यातच शिक्षकांचीही माहिती आहे.
शाळा, महाविद्यालयांचा ‘सरल’मध्ये डेटा भरलेला आहे. परंतू आता शाळा व शिक्षकाची संपुर्ण माहिती या प्रोफाईलमध्ये राहणार आहे. यामुळे दहावी, बारावी परीक्षेच्या नियोजनाच्या अनुषंगाने ही माहिती फायद्याची ठरणार आहे. शिक्षक संख्या परीक्षा केंद्र, विद्यार्थी संख्या सर्व माहिती आॅनलाइन उपलब्ध होईल.- डॉ. श्रीराम पानझाडे, माध्यमिक शिक्षणाधिकारी, बुलडाणा.