मेहकर तालुक्यातील उमरा देशमुख येथे पाच ते सहा दिवसांपूर्वी रॅपिड व आरटीपीसीआर तपासणी शिबिर घेण्यात आले होते. गावात सहा ठिकाणी शिबिराचे आयोजन करून त्यामध्ये गावातील प्रत्येकाची कोरोना तपासणी करण्यात आली. दरम्यान, १६ मे रोजी ४५ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. त्यामध्ये ३९ रुग्ण हे उमरा देशमुख येथील असून, इतर रुग्ण बाहेरगावचे आहेत. गावात रुग्ण आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, सोमवारला उमरा देशमुख येथे घरोघरी जाऊन आरोग्य विभाग व ग्रामपंचायत विभागाने रुग्णांची तपासणी केली. रुग्णांना मेहकर कोविड सेंटर येथे उपचार घेण्याचा सल्ला देण्यात आला; परंतु सर्व रुग्णांनी होम क्वारंटाईन राहण्याला पसंती दिली. त्यानंतर गावातील ३९ रुग्णांची तपासणी केली असता त्यांना कोणत्याही प्रकारची लक्षणे दिसून आली नाही. प्रत्येकाची ऑक्सिजन लेव्हल सुस्थितीत होती. त्यासाठी महसूल विभाग, आरोग्य विभाग, ग्रामस्तरीय समिती यांनी परिश्रम घेतले. गावकऱ्यांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन केले. सर्वच कोरोना पॉझिटिव्ह आलेल्यांची प्रकृती ठणठणीत असल्याने घराबाहेर न येता घरीच उपचार घेणार असल्याचे रुग्णांनी सांगितले.
घाबरू नका, काळजी घ्या
उमरा देशमुख येथे अचानक कोरोनाचा संसर्ग वाढला. त्यामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. परंतु ग्रामस्थांनी घाबरून न जाता आपली आणि आपल्या कुटुबांची काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
गावातील परिस्थिती आता नियंत्रणात आहे. पॉझिटिव्ह आलेल्या प्रत्येकाची तपासणी करण्यात आली आहे. त्यामध्ये एकही रुग्ण गंभीर नाही; परंतु प्रत्येकाने कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांकडे लक्ष द्यावे. सर्वांनी नियमांचे पालन करून घरीच थांबावे.
लता मिलिंद खंडारे, सरपंच, उमरा देशमुख.