लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : नगर पालिकेच्या शौचालयांची अवघ्या पाच कामगारांच्या माध्यमातून स्वच्छता करा... जुन्या कंत्राटदाराचा कंत्राट संपुष्टात आला आहे... अशा आशयाची एक ‘व्हीडीओ क्लिप’ रविवारी खामगावात व्हायरल झाली. या ‘ क्लिप’मध्ये नगर पालिकेच्या आरोग्य सभापती दुर्गा हट्टेल या सफाई कामगारासोबत संवाद साधताना दिसत आहेत. त्यामुळे खामगावात एकच खळबळ उडाली आहे. तथापि, ‘व्हिडीओ क्लिप’ व्हायरल करणाºया विरोधात पोलिसात आॅनलाईन तक्रार करण्यात आली. याप्रकरणी रात्री उशिरा तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खामगाव शहरातील विविध २७ सार्वजनिक शौचालयांच्या स्वच्छतेसाठी बडनेरा येथील एका संस्थेस १ फेब्रुवारी २०१९ रोजी कंत्राट देण्यात आला. कंत्राट मिळाल्यापासून बडनेरा येथील ‘बेरोजगारांची महाविरी सफाई कामगार संस्था’ शहरातील २७ शौचालयांतील ४६५ शीटची स्वच्छता २० ते २५ कामगारामार्फत केली जात आहे. या संस्थेच्या कंत्राट ३१ जानेवारी २०२० रोजी संपुष्टात येणार आहे. मात्र, तत्पूर्वीच खामगाव नगर पालिकेच्या आरोग्य सभापती संबंधीत संस्थेचा कंत्राट संपला असून, २० नव्हे तर अवघ्या पाच कर्मचाºयांवर स्वच्छता करा! असे फर्मान सोडणारी ‘व्हीडीओ क्लीप’ सोशल मिडीयावर व्हायरल झाली. कामगारावर दबावतंत्रासाठी हा प्रयोग करण्यात आल्याची जोरदार चर्चा पालिका वर्तुळात होत आहे. त्याचवेळी या व्हिडीओ क्लिपवरून मोठे राजकीय वादंग निर्माण झाले. याप्रकरणी आरोग्य सभापती दुर्गाताई हट्टेल यांच्यावतीने शहर पोलिसात आॅनलाईन तक्रार दाखल करण्यात आली. या तक्रारीवरून शहर पोलिसांनी भादंवि कलम ५०० अन्वये गोलू महातो रा. खामगाव, ईश्वरलाल राणे रा. अंजनगाव सूर्जी आणि आणखी एका इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
शहरातील विविध शौचालयांच्या स्वच्छतेसाठी अमरावती येथील संस्थेस कंत्राट देण्यात आला आहे. या संस्थेचे काम सुरळीत सुरू आहे. कामबंद करण्याच्या कोणत्याही प्रशासकीय सूचना नाहीत. ‘व्हिडीओ क्लिप’ही सभापतींची अंतर्गत बाब आहे. प्रशासनाचा या गोष्टीशी कोणताही संबंध नाही.
- अनंत निळे, आरोग्य निरिक्षक, नगर परिषद, खामगाव.
केवळ पाच कर्मचाºयांवर काम करा, असे आपण म्हटले नाही. आपल्या भागातील कामगारांनाही सामावून घेण्यावरून हा वाद आहे. ‘व्हिडीओ क्लिप’प्रकरणी पोलिसांत तक्रार दिली आहे. मानहानीचा दावाही आपण करणार आहे.
- दुर्गा हट्टेल, आरोग्य सभापती, नगर परिषद, खामगाव.