जगभरात काेराेना संक्रमण वाढल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले हाेते. गावखेड्यात तर काेरोनाची ग्रामस्थांनी धास्तीच घेतली हाेती. अशा कठीण काळात अतिदुर्गम असलेल्या इसवी उपकेंद्रात डाॅ. नलिनी तायडे यांनी ग्रामस्थांच्या मनातून काेराेनाविषयीची भीती काही प्रमाणात कमी केली.
प्राथमिक आरोग्य केंद्र डोणगाव अंतर्गत उपकेंद्र इसवी येथे डॉ. नलिनी तायडे या गत दाेन वर्षापासून वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. काेरेानाच्या भीतीने डाेणगाव परिसरातील अनेक खासगी डाॅक्टरांनी रुग्णालये बंद केली हाेती. त्यामुळे रुग्णांचा भार प्राथमिक आराेग्य केंद्र व उपकेंद्रावर वाढला हाेता. हा भार समर्थपणे सांभाळत डाॅ. तायडे यांनी रुग्णांची सेवा केली. तसे रुग्णांचे स्वॅब घेणे, रॅपिड टेस्ट करणे तसेच दूषित निघालेल्या रुग्णाचे कॉन्टॅक्ट टेसिन्ग करणे आदींसह काेराेना पाॅझिटिव्ह रुग्णांना धीर देण्याचे काम डाॅ. तायडे यांनी केले. या उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या पाच गावांमध्ये त्यांनी आरोग्य सेवक, सेविका, आशा सेविका व अंगणवाडी सेविका यांचा समन्वय साधून काेराेनाविषयी जनजागृती केली. फेब्रुवारी महिन्यात रुग्णसंख्या वाढल्यानंतरही त्यांची सेवा सुरूच आहे.