हिवरा खुर्द येथे गेली १५ दिवसापासून डेंग्यूसदृश तापाने थैमान घातले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. रुग्णांवर जानेफळ, बुलडाणा आणि औरंगाबाद विविध ठिकाणी उपचार सुरू आहे. २३ व २४ जुलै रोजी जानेफळ प्राथमिक आरोग्य विभागाचे पथक हिवरा खुर्द येथे दाखल होऊन गावात घरोघरी जाऊन तपासणी करण्यात आली. ताप असलेल्या २८ रुग्णांचे रक्ताचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत पाढविले आहेत. कन्टेनर सर्वेक्षण करण्यात येऊन रुग्णांवर औषधोपचार करण्यात आले. यावेळी ताप असलेल्या रुग्णांची कोरोना चाचणी करण्यात आली. ग्रामपंचायतच्या सहकार्याने स्वच्छता मोहीम हाती घेऊन गाव परिसरातील तुंबलेल्या नाल्या खुल्या करणे, डास उत्पती आगारे नष्ट करणे, पाणी वाहते करणे, केरकचरा पेटून देणे, घराच्या अवतीभोवतीचे वातावरण स्वच्छ ठेवणे, धूर फवारणी करणे, गावकऱ्यांनी पिण्याच्या पाण्याचे भांडे कोरडे करून आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा, आदी बाबीवर मार्गदर्शन केले. बुलडाणा जि.प. अध्यक्ष मनिषा पवार यांनीही याची दखल घेऊन आरोग्य यंत्रणेला व ग्रामपंचायत प्रशासनाला सूचना दिल्या. ताप आल्यास रुग्णांनी व नातेवाइकांनी घाबरून जाण्याचे कारण नसून आरोग्य यंत्रणेचे एक पथक हिवरा खुर्द येथे साथ संपेपर्यंत काम करेल, असे सांगितले.
हिवरा खुर्द येथ धूर फवारणी
यावेळी जानेफळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी डॉ. स्वप्निल चव्हाण, डॉ. सुरज ठाकरे, डॉ. स्नेहा गडाख, आरोग्यसेवक बबन काकडे, आरोग्य सेविका दाभाडे, जेऊघाले, गावंडे, इंगोले, डाखोरे, दांडगे, धनंजय जाधव, गजानन अवचार, आशा सेविका आदीचे पथक लक्ष ठेवून आहे. येथील सरपंच संगीता रमेश खरात, उपसरपंच अशोक शिंदे, ग्रामसेवक एस.टी. मोरे तसेच ग्रा. पं. सदस्य यांनी आरोग्य विभागाला सहकार्य करून गावात धूर फवारणी केली.