चिखली येथील हे कोविड केअर सेंटर २०२० पासून सुरू आहे. आतापर्यंत या सेंटरमधून ६ हजार ६३५ रुग्ण बरे होऊन गेले आहेत. उपचारादरम्यान येथे एकाही रुग्णाचा येथे मृत्यू झालेला नाही, हे विशेष. मात्र रुग्णांना जीवनदायी ठरत असलेल्या या कोविड सेंटरचे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी व वैद्यकीय साहित्य पहिल्यापासूनच अपुरे होते व आता यातीलही काही अधिकारी, कर्मचारी, साहित्य व औषध साठा इतर ठिकाणी हलविण्यात आला आहे. परिणामी या कोविड रुग्णालयाचा आधारच काढून घेण्यात आल्यामुळे येथे उपचार करणे जिकिरीचे ठरत आहे. या सेंटरवर रुग्ण मोठ्या प्रमाणावर येत असताना, एकही एमबीबीएस डॉक्टर न ठेवणे, डॉक्टर्स व स्टाफ, अैाषधी अन्यत्र हलविणे म्हणजे रुग्णांच्या जिवाशी खेळ करण्यासारखे असून, संबंधितांवर तत्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अनुषंगिक निवेदनाद्वारे माजी आ. राहुल बोंद्रे यांनी केली आहे.
अनुराधानगर, चिखली येथील हे शासकीय कोविड सेंटर जिल्हयातील सर्वात पहिले व सर्वात मोठे सेंटर असून, २०० खाटांचे आहे. त्या तुलनेत येथे मनुष्यबळ देणे अपेक्षित आहे. येथे दोन एमबीबीस डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी म्हणून पाहिजे. मात्र येथे एकही डॉक्टर उपलब्ध नाही. आयुष मेडिकल ऑफिसर १० पैकी फक्त पाचच उपलब्ध आहेत. स्टाफ नर्सही २४ पैकी फक्त ७ कार्यरत आहेत. हाॅस्पिटल मॅनेजर १ जागा, लॅब टेक्निशियन २, स्वीपरच्या सहा जागा रिक्त आहेत. फार्मिस्ट, कक्ष सेवकांचीही संख्या अपुरी आहे. त्यामुळे उपरोक्त बंद केलेल्या साहित्य सुविधा व कर्मचारी संख्याबळ तात्काळ उपलब्ध करून दयावे, अशी मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा काँग्रेसचे माजी आ. राहुल बोंद्रे यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची भेट घेऊन केली आहे.