लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यात दोन दिवसापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून गेल्या २४ तासात जिल्ह्यातील ९१ प्रकल्पांमधील जलसाठ्यात तब्बल आठ टक्यांनी वाढ होऊन त्याची टक्केवारीही २५.१६ टक्क्यांवर पोहोचली आहे. दरम्यान, मध्यप्रदेशात होत असलेल्या दमदार पावसामुळे वान प्रकल्प भरण्याच्या मार्गावर असून या प्रकल्पाचे सहा दरवाजे अर्ध्याफुटापर्यंत उघडण्यात आले असून त्यातून ६००० क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग होत आहे.दरम्यान, विदर्भ मराठवाड्याच्या सिमावर्ती भागात असलेल्या धामणा नदीलाही पुर आल्याने सातगाव म्हसला येथील पुल पाण्याखाली गेला असून त्यामुळे धाड-औरंगाबाद या मार्गावरील वाहतूक दुपारी ठप्प झाली होती तर पैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे पळसखेड नागो नजीकचा अस्थायी पुल पाण्याखाली गेल्याने तेथील वाहतूकही बंद झाली.
दुसरीकडे या संततधार पावसामुळे २४ तासातच पावसाच्या वार्षिक सरासरीमध्ये सहा टक्कयांनी वाढ होऊन ही सरासरी ६४.६४ टक्क्यांवर पोहोचली आहे. विशेष म्हणजे संग्रामपूर तालुका येत्या काही दिवसात पावसाची वार्षिक सरासरी गाठण्याची शक्यता असून या पावसामुळे या तालुक्यातील वार्षिक सरासरी ही ९२.१० टक्क्यांवर पोहोचली आहे. बुलडाणा तालुक्याचीही पावसाची सरासरी ही ८२.०८ टक्क्यांवर पोहोचली आहे तर शेगाव तालुक्याची सरासरी ही ८० टक्के झाली आहे. दरम्यान, संततधार पडणारा हा पाऊस जिल्ह्यात सार्वत्रिक स्वरुपाचा पडत आहे. देऊळगाव राजा व सिंदखेड राजा तालुक्यात या पावसाचा जोर कमी आहे. या दोनही तालुक्यात अनुक्रमे आठ आॅगस्ट रोजी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासात सरासरी ७.६ आणि ८.१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. या दोन्ही तालुक्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या अनुक्रमे ३७.४८ आणि ५३.६३ टक्के पाऊस पडला आहे. त्यामुळे या दोन्ही तालुक्यात अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. लोणार तालुक्यातही अशीच काहीशी स्थिती असून येथे वार्षिक सरासरीच्या ४७.२४ टक्के पाऊस पडला आहे. हे तीनही तालुके वगळता अन्य तालुक्यात मात्र पाऊस दमदार पडत आहे.या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील ९१ प्रकल्पांमध्ये २४ तासातच आठ टक्यांनी वाढ झाली असून वर्तमान स्थितीत १३४.२७ दलघमी पाणीसाठा प्रकल्पांमध्ये झाला आहे. मोठ्या प्रकल्पापैकी नळगंगा प्रकल्पामध्येही पाच टक्के, पेनटाकळी प्रकल्पामध्ये १४ टक्के वाढ झाली आहे.आता प्रकल्पांमध्ये जलसाठा वाढण्यास या पावसामुळे मदत होत असून जिल्हयात गुरूवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासात सरासरी २५.३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे नदी, नाले ओसंडून वाहत असून मोठ्या प्रकल्पांपैकी पेनटकाळी प्रकल्प, ज्ञानगंगा आणि मस प्रकल्पांमध्ये जलसाठ्यामध्ये मोठी वाढ झाली आहे. खामगाव, चिखली आणि मेहकर शहरांसाठीच्या उन्हाळ््यातील पिण्याच्या पाण्याच्या दृष्टीने दिलासादायक म्हणावी लागले. लघु प्रकल्पांपैकी करडी, मातला, केसापूर, झरी, दहीद, वरवंड येथील प्रकल्प १०० टक्के भरले आहेत.