धाड : परिसरात शनिवारी सायंकाळी अचानक वातावरण बदल होऊन वादळी वाऱ्यासह पाऊस झाला़ वादळामुळे वीजपुरवठाही खंडित झाला हाेता़ सोसाट्याचा वारा आणि पावसामुळे अनेक घरांवरील टीनपत्रे उडाले हाेते़ सध्या पावसापूर्वी शेतकरी शेतात गोठा बांधणी, जनावरांच्या वैरणाची साठवण, बांधबंदिस्ती, तथा पेरणीपूर्वी मशागत यांची तयारी करण्यात गुंतला आहे़ शनिवारी पावसाने जोरदार हजेरी लावली. मागील काही दिवसांपासून वातावरणात होणारा बदल आणि ढगाळ वातावरणामुळे पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात येत होता़ तथापि, शेतकऱ्यांनी पेरणीसाठी आवश्यक बियाणे, खते, तथा पेरणीपूर्वी अंतर मशागत आदी कामांना प्राधान्य दिले हाेते. धाडसह भागातील ४५ गावखेड्यांत वादळासह पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले हाेते. अनेक शेतकऱ्यांच्या जनावरांचा चारा पावसाने भिजला असून वैरण भरणी, गोठा बांधणी या कामात अडथळा निर्माण झाला आहे. मान्सूनच्या पावसाचे आगमन यंदा लवकर होण्याचे संकेत हवामान खात्याने दिले असल्याने शेताशिवारात कामांची लगबग वाढली आहे. अचानक वादळी पावसाने शेतकऱ्यांचे नियोजन कोलमडून पडले आहे.
धाड परिसरात जाेरदार पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 4:25 AM