खामगाव - रविवारी दुपारी ४ वाजतापासून सोमवारी सकाळी ११ वाजेपर्यंत आलेल्या संततधार पावसामुळे खामगाव शहरालगतची गावे आणि वस्त्या जलमय झाल्या होत्या. घाटपुरी गावात पाणी घुसल्यामुळे अनेकांच्या घराची पडझड झाली. जिवितहानी झाली नसलीतरी मोठ्याप्रमाणात ग्रामीण भागात वित्तहानी झाल्याचे वृत्त आहे.
खामगाव आणि परिसरात रविवारी पहाटेपासूनच काही भागात जोरदार पाऊस झाला. रविवारी सायंकाळी जनुना, घाटपुरी, सुटाळा, रोहणा, वर्णा, काळेगाव परिसरात संततधार पाऊस झाला. खामगाव शहरातील फरशी पुलावरून तसेच घाटपुरी येथील पुलाला पाणी टेकले होते. पुलावरून पाणी वाहत असल्याने खामगाव पिंपळगाव राजा रस्त्यावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. घाटपुरी येथील नवनाथ मंदिराजवळ मोठ्याप्रमाणात पाणी साचले. त्याचप्रमाणे घाटपुरीतील सखल भागात पाणी घुसल्याने, शिवसिंग चव्हाण, रामसिंग चव्हाण आणि इतरांच्या घरात पाणी घुसल्याने मोठ्याप्रमाणात नुकसान झाले. खामगाव ग्रामीण ग्रामपंचायतीतील काही नागरिकांना या पावसाच्या पाण्याचा फटका बसला. गोपाळ नगर, ओम नगरासह शहरानजीकचा काही भाग जलमय झाला होता. काही शेतशिवारात गुडघाभर पाणी साचल्याने पिकांचेही मोठ्याप्रमाणात नुकसान झाल्याचे वृत्त आहे.
फरशी पुलावरून वाहले पाणी
पावसाचा जोर जास्त असल्यामुळे नदी नाले एक झाले होते. शहरातील काही वस्त्या जलमय झाल्या. तर सकाळी फरशी पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते. यामुळे खामगाव शहर आणि शिवाजी वेस भागाचा संपर्क काही काळ तुटला होता.