खामगाव : जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. खामगावात सोमवारी रात्री ५५ मिमी पाऊस पडला. वडगाव वान परिसरात २७ नोव्हेंबरच्या रात्री वीज पडल्याने वीजवाहिनी क्षतीग्रस्त झाली. परिणामी परिसरातील नागरिकांना रात्रभर अंधारात राहावे लागले.
गत दोन दिवसांपासून जिल्ह्यात जोरदार पाऊस बरसत आहे. दिवसभर ढगाळ वातावरण असून, गारवा वाढला आहे. या अवकाळी पावसामुळे भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे भाजपाला उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहे. पावसामुळे टोमॅटो, वांगे, मिरची पिकाची झाडांचे नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना हजारो रुपयांचा फटका बसला आहे. कांद्याच्या रोपासाठी ज्यांनी बी टाकले त्यांचे नुकसान झाले आहे.
वडगाव वान परिसरात २६ नोव्हेंबरच्या रात्री १० वाजतापासून विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरूवात झाली. २७ नोव्हेंबरच्या रात्री सुध्दा पाऊस सतत सुरू होता. वडगाव वान परिसरातील गावांना वरवट बकाल वीज वितरण केंद्रातून पुरवठा केला जातो. वीज वाहिनीवर वीज पडल्याने रात्रभर नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागला. २८ नोव्हेंबरच्या सकाळी वितरण कर्मचारी प्रवीण हागे आणि त्यांचे सहकारी यांनी वीजवाहिन्यांची पहाणी सुरू केली असता एकलारा बानोदा गावाजवळ विद्युत खांबावर रात्री वीज कोसळून वीजवाहक तार तुटली असल्याचे निदर्शनास आले. वीज पडल्याने ४ खांबांवरील इन्शुलेटर जळाले. २८ नोव्हेंबर रोजी सकाळी वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. या पावसामुळे हरभरा, गहू, रब्बी ज्वारी पिकांना फायदा होणार आहे.