खामगाव : तालुक्यात २० एप्रिल रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. अचानक झालेल्या पावसामुळे आठवडी बाजारातील व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीतील शेतकर्यांचा शेतमाल भिजला.
तालुक्यात गुरुवारी ३ वाजताच्या दरम्यान ढगाळ वातावरण निर्माण झाले व वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. गत दहा दिवसांपासून तालुक्यात पाऊस होत आहे. त्यामुळे फळबागा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.
तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी केळी, संत्रा, पपईच्या बागा लावल्या आहेत. वादळी वाऱ्यामुळे केळीची झाडे पडली तसेच संत्र्याच्या झाडांचेही नुकसान झाले. हजारो रुपये खर्च करून शेतकऱ्यांनी फळबागांची लागवड केली. मात्र, पावसामुळे नुकसान सहन करावे लागत आहे. या पावसामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेला शेतमाल भिजला. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागले.