साखरखेर्डा : साखरखेर्डा मंडळात मंगळवारी (दि. १३) आिण बुधवारी मुसळधार पाऊस पडल्याने शेतांत पाणी साचले होते. काही ठिकाणी शेतीचे बांध फुटल्याने शेतजमीन खरडून गेल्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
साखरखेर्डा मंडळातील राताळी, मोहाडी, सवडद, साखरखेर्डा भागांत मंगळवारी दुपारी पावसाने हजेरी लावली. तब्बल एक तास मुसळधार पाऊस पडल्याने शेतांमध्ये पाणी साचल्याने शेतांना तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते़ गेल्या दीड महिन्यापासून साखरखेर्डा मंडळात पावसाने चांगलीच दमदार हजेरी लावून शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे़ त्याचबरोबर अतिवृष्टी होत असल्याने छोटे-मोठे बांध फुटले आहेत. बांध फुटल्यामुळे शेतजमीन आणि पिके खरडून गेली आहेत. यामध्ये शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. सिंदखेडराजा तालुक्यात काही भागांत अतिवृष्टी, तर काही भागांत जेमतेम पाऊस पडत असल्याचे दिसून येत आहे. साखरखेर्डा परिसरातील अनेक पाझर तलाव गावतलाव ९० टक्के भरले आहेत. नदी-नाले खळाळून वाहत आहेत, असे दिलासादायक चित्र दिसून येत आहे. मलकापूर पांगरा, दुसर बीड, किनगाव राजा, सोनोशी मंडळात दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.
अनेक शेतकऱ्यांचे नुकसान
मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे नंदकिशोर रिंढे यांच्या शेतातील फुटलेल्या बांधामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. मोहाडी ते फाटा या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना नाली काढलेल्या नसल्याने पाणी रस्त्यावरच साचते. याची दखल घेऊन जिल्हा परिषोच्या बांधकाम विभागाने नाली काढून पाण्याची वहिवाट मोकळी करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली होती. परंतु कनिष्ठ अभियंता यांनी दखल घेतली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना जाता-येता गुडघाभर पाण्यातून वाट शोधत जावे लागते. याची दखल अधिकाऱ्यांनी घेतली नाही तर आंदोलनाचा इशारा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शिवदास रिंढे यांनी दिला आहे़