लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : तालुक्यात रविवारी दमदार पावसाने हजेरी लावली. दुपारी दोन ते चार वाजेदरम्यान हा पाऊस बरसला त्यामुळे तालुक्याची पावसाची सरासरी वाढण्यास मदत होणार आहे. सोबतच पिकांनाही त्यामुळे संजीवनी मिळणार आहे.मुळात यावर्षी बुलडाणा तालुक्यात तुलनेने कमी पाऊस पडला आहे. आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या अवघा २८ टक्केच पाऊस तालुक्यात पडला आहे. त्यामुळे पिकांना पावसाची गरज होती. त्यातच योग्य वेळी हा पाऊस पडल्याने पिकांची वाढ चांगली होऊन फळधारणार होण्यास मदत होणार आहे. बुलडाणा तालुक्यातील अनेक भागात मधल्या काळात विखुरलेल्या स्वरुपात पाऊस पडला होता. त्यामुळे अनेक ठिकाणी पेरण्याही रखडलेल्या होत्या. मात्र या पावसामुळे त्याचा मार्ग मोकळा झालेला असून ज्या ठिकाणी पेरण्या झाल्या आहेत तेथील पिकांनाही जीवदान मिळण्यास मदत होणार आहे.दुसरकीडे जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी २४८ मिमी पाऊस पडलेला आहे. अद्यापही वार्षिक सरासरीच्या तुलनेत पावसाची सहा टक्के तूट आहेच. मात्र रविवाराच्या पावसामुळे खरीपाच्या उत्पनात चांगली वाढ होईल, अशी आशा पल्लवीत झाली आहे.
बुलडाणा तालुक्यात दमदार पाऊस; शेतकरी सुखावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 12:08 PM