लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: जिल्ह्यात विश्रींतीनंतर पुन्हा पावसाने सार्वत्रिक स्वरुपात हजेरी लावली असून शेगाव तालुक्याला अतिवृष्टीचा फटका बसला आहे. तालुक्यातील पाचही मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आहे. दरम्यान, पुराच्या पाण्यात जवळा बुद्रूक येथून वाहून गेलेल्या एकाचा मृत्यू झाला आहे. बुलडाणा जिल्ह्यात मधल्या काळात पावसाने विश्रांती दिली होती. १५ जुलै रोजी पहाटे जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली. सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासात जिल्ह्यात सरासरी २१.२ मिमी पावसाची नोंद झाली असून यामध्ये सर्वाधिक पाऊस हा शेगाव तालुक्यात झाला असून त्याची नोंद १०८ मिमी ऐवढी आहे. तालुक्यातील पाचही मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आहे. यामध्ये शेगाव मंडळात १०५ मिमी, मनसगावमध्ये ७८, माटरगावमध्ये १०८, जलंबमध्ये ८७ आणि जवळपा बुद्रूक मंडळामध्ये १६६ मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे तालुक्यातील नदी, नाल्यांना पुर आला असून या पुरात जवळा बुद्रूक येथील एक जण वाहून गेला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. खामगाव तालुक्यातील लाखनवाडा ८० आणि अटाळी मंडलात १०४ मिमी पावसाची नोंद झाली असून या पावसामुळे नेमके किती नुकसान झाले याचा अंदाज सध्या महसूल प्रशासन घेत आहे. दुसरीकडे बुलडाणा जिल्ह्यात जुलै महिन्यातील हा सार्वत्रिक स्वरुपाचा मोठा पाऊस म्हणावा लागेल. मोताळा तालुक्यात अल्प प्रमाणात हा पाऊस पडला असला तरी अन्य १२ तालुक्यात या पावसाने दमदार हजेरी लावलेली आहे. शेगावमध्ये १०८ मिमी तर संग्रामपूर तालुक्यात ४६.४ मिमी ऐवढी या पावसाची नोंद झाली आहे. खामगाव तालुक्यात ४०.३ तर नांदुरा तालुक्यात २२.२ मिमी ऐवढा पाऊस पडला आहे. मेहकर तालुक्यातही ११ मिमी पावसाची नोंद आहे. १५ जुलै रोजी जिल्ह्यात सरासरी २१.२ मिमी पावसाची नोंद झाली असून गेल्या वर्षी याच दिवशी केवळ बुलडाणा तालुक्यात १.१ मिमी पावसाची नोंद झाली होती. गेल्यावर्षी जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या २८ टक्के पाऊस पडला होता. त्या तुलनेत यंदा सरासरी आठ टक्के पाऊस अधिक पडला असल्याचे सुत्रांनी सांगितले.
सरासरी ३६ टक्के पाऊस
जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ३६ टक्के पाऊस पडला आहे. यामध्ये मलकापूर तालुक्याची वार्षिक सरासरी ही ४९ टक्क्यांवर पोहोचली असून संग्रामपूर तालुक्यात ती ४८ टक्के आहे. जवळा येथील एकाचा मृत्यू जवळा येथील उस्मान खान सरदार खान या व्यक्तीचा पुराच्या पाण्यात वाहून घेल्याने मृत्यू झाला. त्याचे पार्थिवही सापडले आहे. पुराच्या पाण्याने जवळपा बुद्रूक येथील घरांचेही मोठे नुकसान झाले आहे.