किनगाव जट्टू : परिसरात रविवारी सायंकाळी जाेरदार पाऊस झाला़ त्यामुळे परिसरातील नदी-नाल्यांना पूर आला हाेता़ पुराचे पाणी अनेक शेतकऱ्यांच्या शेतात शिरल्याने जमीन खरडून गेली आहे़ त्यामुळे, अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणी करण्याचे संकट ओढवले आहे़ शासनाने नुकसानीचे सर्वेक्षण करून मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे़
किनगाव जट्टू परिसरात यावर्षी अत्यल्प पावसात व हवामान खात्याच्या अंदाजावर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली हाेती़ मात्र, गत आठवड्यात कडक ऊन पडल्याने पेरण्या खाेळंबल्या हाेत्या़ अनेक शेतकऱ्यांचे बियाणे पावसाअभावी उगवलेच नाही़ रविवारी सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान विजेच्या कडकडाटासह एक ते दीड तास जाेरदार पाऊस झाला़ त्यामुळे गावाशेजारील नारळी नदीला पूर आल्याने पुलावरून पाणी वाहत हाेते़ त्यामुळे शेतात गेलेल्या मजुरांना ताटकळत थांबावे लागले़
पेरणी केलेल्या शेताला तलावाचे स्वरूप
रशीद खान पठाण यांच्या ताब्यात असलेल्या दोन एकर सोयाबीन पेरलेल्या शेतात पावसाचे पाणी साचल्याने तलावाचे स्वरूप निर्माण झाले होते़ काही शेतकऱ्यांच्या शेतात शेतशिवारातील नाल्याचे पाणी गेल्याने जमिनी खरडल्या आहेत. तीन दिवसांअगोदर पेरणी केलेल्या शेतात पावसाचे पाणी साचल्याने बियाणे जमिनीत खाेलवर पडले आहे़ त्यामुळे दुबार पेरणीशिवाय दुसरा पर्याय नाही़
यापूर्वीही झाले आहे नुकसान
अगोदरच परिसरात कोरोनाचे संकट आहे़ गतवर्षी अनेक शेतकऱ्यांना दुबार, तिबार पेरणी करावी लागली़ सोंगणीच्या
वेळी अतिवृष्टीमुळे उभ्या पिकाचे अतोनात नुकसान झाल्याने पेरणीला लागलेला खर्चही वसूल झाला नाही़ या संकटातून सावरत शेतकऱ्यांनी नव्या उमेदीने यावर्षी पेरण्या सुरू केल्या हाेत्या़ तोच पुन्हा दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे़
मदत देण्याची मागणी
परिसरातील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेताची पाहणी करून पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी शासनाकडे अहवाल पाठवावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड यांनी तहसीलदार लोणार यांच्याकडे केली आहे.