तालुक्यामध्ये ३१० मिली मीटर पाऊस झाला आहे. त्यामुळे तालुक्यातील पिकांची परिस्थिती अत्यंत नाजूक झाली होती. या पावसामुळ पिकांना जीवनदान मिळाले आहे़
मृग नक्षत्रात झालेल्या पावसावर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केली हाेती. त्यानंतर, पावसाने दांडी मारल्याने पिके सुकत हाेती. अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले हाेते. कडक उन्हं तापत असल्याने, पिके करपून जाण्याची भीती व्यक्त हाेत हाेती. पावसाची नितांत गरज असतानाच, रविवारी रात्री ३४ मिमी पाऊस पडला. तालुक्यामध्ये काही भागांत मुसळधार पावसाने हजेरी लावली. तत्पूर्वी दिवसभर प्रचंड ढग दाटून येत होते. वातावरणातील उकाडा वाढला होता. त्यामुळे रात्री आठच्या सुमारास जोरदार पाऊस झाल्याने, तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. त्यानंतर, सोमवारी काही भागांत दुपारी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. प्रचंड सोसाट्याचा वारा वाहत होता. त्यातच मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे बळीराजा सुखावला आहे. माना टाकलेल्या पिकांना यामुळे जीवदान मिळेल. विशेषतः जनावरांच्या पाण्यासाठी नदी, नाले आणि तळ्यांमध्ये माेठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.
रस्ते गेले वाहून
लोणार तालुक्यातील भुमराळा, सावरगाव, गायखेड, पिपळनेर, हिरडव, रायगाव, अजिस्पूर, येवती, सुलतानपूर येथे जोरदार पाऊस झाल्याने, काही ठिकाणी रस्ते वाहून गेले. काही भागांमध्ये शेतात तर पाणी पाणी साचले हाेते. यापूर्वी ९ जून रोजी लोणार तालुक्यामध्ये एकाच दिवशी १०४ मिलिमीटर पाऊस झाला हाेता.