साखरखेर्डा येथे आणि परिसरात मुसळधार पाऊस पडला असून भोगावती नदीला पूर आला आहे. या महिन्यातील हा तिसरा पूर आहे.
साखरखेर्डा मंडळात साेमवारी पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. पहिल्या पावसात काही नुकसान झाले नाही. १५ जूनला सवडद, मोहाडी, राताळी, गुंज, शिंदी, गोरेगाव, उमनगाव पांग्रीकाटे परिसरात मुसळधार पाऊस पडल्याने शेतातील बांध फुटले. नदीनाल्यांना पूर आल्यामुळे सवडद, उमनगाव येथील छोटे पूल वाहून गेले होते व तर अनेकांच्या शेतजमिनी खरडून गेल्या होत्या. शेतजमिनीत बी खाेलवर गेल्याने अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. साेमवारी साखरखेर्ड्यासह परिसरातील शिंदी, राताळी, सवडद, मोहाडी, गुंज, तांदूळवाडी पिंपळगाव सोनारा, गोरेगाव भागात तब्बल एक तास मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. भोगावती नदीला पूर आल्याने ग्रामस्थांनी पूर पाहण्यासाठी गर्दी केली होती.
तलावात जलसाठा वाढला
साखरखेर्डा मंडळात जाेरदार पाऊस पडला आहे. त्यामुळे परिसरातील अनेक कोल्हापुरी बंधारे, छोटे तलाव भरले असून मोठ्या तलावात ७५ टक्के जलसाठा वाढला आहे. सवडद येथील कोराडी नदीला पूर आल्याने अनेकांच्या शेतात पाणी शिरले आहे. मोहाडी येथून वाहणाऱ्या नदीलाही पूर आला आहे़ अनेकांच्या शेतात पुराचे पाणी गेल्याने शेत जमिनीचे नुकसान झाले आहे . शुक्रवार, रविवार आणि सोमवारला चांगलीच हजेरी लावल्याने शेतातील सर्व कामे ठप्प झाली आहेत. सर्वच शेतात पाणी साचलेले दिसून येत आहे़