मोताळा शहरातील काही घरांमध्ये पावसाचे पाणी घुसल्याने घरांचे नुकसान झाले आहे. वीज पडून खामगावातील एका घरातील इलेक्ट्रिक व इलेक्ट्रॉनिक साहित्याचे नुकसान झाले आहे. या पावसामुळे नेमके किती नुकसान झाले, याचा अंदाज अद्याप स्पष्ट नसला तरी, नुकसानीची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
जिल्ह्यातील प्रकल्पांमधील पाणीसाठ्यातही या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. दुसरीकडे मोताळा आणि बुलडाणा तालुक्यात झालेल्या नुकसानीसंदर्भात माजी आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याशी भ्रमणध्वनीवर चर्चा करून मदतीसंदर्भात केलेल्या चर्चेला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. या पावसामुळे जिल्ह्याची वार्षिक सरासरी ७३ टक्क्यावर पोहोचली आहे. पावसामुळे नांदुरा-मोताळा हा मार्ग बंद झाला आहे. पूर्णा नदीसह पैनगंगा व अन्य नद्यांना पूर आलेला आहे.