जानेफळ : मृग नक्षत्रास सुरुवात झाल्यानंतर जानेफळसह परिसरात दमदार पावसाचे आगमन झाल्याने शेतकरी वर्ग सुखावला असून, पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांनी पेरणीलासुद्धा सुरुवात केली आहे.
शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या पेरणीच्या घाईमुळे बाजारपेठेत पुरेसे बियाणे उपलब्ध नसल्याने कृषी केंद्रचालकांनी शेतकऱ्यांची लूट चालविली असून, अव्वाचे सव्वा भावाने बियाणांच्या थैलीची विक्री होत आहे. कृषी विभाग मात्र केवळ बघ्याची भूमिका घेत आहे.
यावर्षी खरिपाच्या हंगामाची सुरुवात ही शेतकऱ्यांना फार महागडी ठरत असून, आधीच ट्रॅक्टर मालकांनी डिझेलचे भाव वाढल्यामुळे पेरणीपूर्व मशागतीच्या सर्व कामांची मजुरी वाढविलेली आहे. त्यातच आता बियाणांच्या प्रतिबॅगमागे ७०० ते ८०० रुपये जादा मोजून शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणे खरेदी करणे भाग पडत आहे. मागील वर्षी सोयाबीन काढणीच्या वेळी सतत सुरू असणाऱ्या पावसामुळे सोयाबीन खराब झाल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री केली. यामुळे यंदा लावगडीसाठी घरची सोयाबीन बियाणे शिल्लक नसल्याने कंपनी पॅकिंगच्या सोयाबीन बॅगा विकत घ्याव्या लागत आहेत. यामुळे पुरेशा मालाचा साठा उपलब्ध नसल्याने तसेच शेतकऱ्यांकडून विशिष्ट कंपनीच्या बियाणांचीच जादा मागणी होत असल्याने कृषी केंद्रचालक याचा गैरफायदा घेऊन ३२०० रुपये किंमत असलेल्या सोयाबीन बियाणांची बॅग चार हजार ते ४२०० रुपयांत विक्री करत आहे. याबाबत काही शेतकऱ्यांनी कृषी अधिकारी काळे यांच्याकडे भ्रमणध्वनीवर तक्रार केली. मात्र कृषी अधिकाऱ्यांनी स्टॉक तपासण्याचा त्रास न घेता तुम्ही दुकानदाराची तक्रार करा, नंतर मी येतो असे उत्तर दिले. यावरून सदर शेतकऱ्यांच्या लूटमारीचा हा प्रकार कृषी विभागाच्या संगनमतानेच सुरू असल्याची चर्चा होत आहे.
रासायनिक खतांच्या बाबतीतसुद्धा कृषी केंद्रचालकांची मनमानी सुरू असून, शेतकऱ्यांना पाहिजे ती खते मिळत नसल्याने दुकानात उपलब्ध असलेली खतेच शेतकऱ्यांना खरेदी करावे लागत आहेत.
केवळ आठ शेतकऱ्यांना मिळाले अनुदानित बियाणे
कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना बियाणे वाटपासाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले होते. यातून लॉटरी पद्धतीने केवळ ८ शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणे, तर २५ शेतकऱ्यांना तुरीचे बियाणे मिळाले आहेत. यामुळे शेतकऱ्यांची ही केवळ थट्टाच सुरू असल्याचे दिसत आहे. जगाचा पोशिंदा म्हणून समजल्या जाणाऱ्या शेतकऱ्याची लूट सुरू असताना याकडे दुर्लक्ष हाेत आहे.
कृषी विभागाच्या आवाहनाकडे दुर्लक्ष
शेतकऱ्यांनी सध्या पेरणीची घाई करू नये म्हणून कृषी विभागाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. शेतकरीवर्ग मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत महागडी बियाणे व रासायनिक खते खरेदी करून मोठ्या जोमात पेरणीच्या कामाला लागला आहे.