विवेक चांदूरकर, लोकमत न्यूज नेटवर्क, खामगाव जि. बुलढाणा: जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात मंगळवारी दुपारी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे अनेक झाडे पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. तसेच अनेकांच्या घरावरील छत उडून गेले असून, वीजेचे खांबही पडले.
शेगाव तालुक्यात मंगळवारी दुपारी २ ते ३ वाजताच्या दरम्यान वादळी वार्यासह जोरदार पाऊस झाला. तसेच काही भागात गारपीट झाली. या पावसामुळे शेगाव ते आकोट मार्गावर झाडे पडली. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक काही वेळाकरिता ठप्प झाली होती. तसेच शेगाव शहरात ठिकठिकाणी झाडे पडली. वीजेचे खांब पडले. विविध फलकही पडले. अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे व्यावसायिकांचेही नुकसान झाले. भाजीपाला विक्रेते, कापड विक्रेते तसेच माठ विक्रेत्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या पावसामुळे ज्वारीसह अन्य पिकांना फटका बसला आहे. वादळी वाऱ्याने ज्वारी जमीनदाेस्त झाली आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. रब्बी हंगामात तिसऱ्यांदा पिकांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे.