या पुलाच्या डागडुगीचे काम सुरू असतानासुद्धा वाहतूक सुरूच आहे. अशा परिस्थितीत या ऐतिहासिक पुलाच्या कामाबद्दल शंका निर्माण होत आहे. नादुरुस्त पुलामुळे अपघात घडल्यास त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून १० जुलै २०२० रोजी पुलावरून अवजड वाहतूक बंद राहील, असा आदेश काढला होता. मात्र, त्या आदेशाला अवजड वाहतूक करणाऱ्यांनी ‘खो’ दिला आहे. खडकपूर्णा नदीवरील पुलावरून सध्या फक्त बस जात नाही. पण, रात्री ट्रॅव्हल्सची बिनधास्त वाहतूक होत आहे.
अशी केली कारवाई
कोणत्याही पुलावरून अनुचित प्रकार घडू नये म्हणून नव्यानेच किनगाव राजा पोलीस स्टेशनला आलेले ठाणेदार युवराज रबडे यांनी अवजड वाहतूक बंद करण्याची मोहीम हाती घेतली. त्यांनी ३० ऑगस्ट रोजी सिंदखेडराजाकडून येणाऱ्या २० जड वाहनांवर कारवाई केली. १५ वाहन चालकांकडून प्रत्येकी एक हजार रुपये दंड वसूल करून वळविलेल्या मार्गाने वाहने परत केली. या वेळेस ३४ वाहन चालकांकडून १४ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ही कारवाई ठाणेदार युवराज रबडे, राजू दराडे, सुधाकर गवई, अशोक चाटे, गजानन सानप, श्रावण डोंगरे, नाजिम चौधरी, जाकीर पठाण, संजय म्हस्के, सलीम परसुवाले, महादू साळवे यांनी केली.
पोलीस कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने कालपासून राहेरी बु येथील खडकपूर्णा नदीवरील नादुरुस्त पुलावरून अवजड वाहतूक बंद करण्यात आली असून, पुलाचे काम होईपर्यंत आणि जिल्हा अधिकारी यांचा आदेश येईपर्यंत ती बंद राहणार आहे.
- युवराज रबडे, ठाणेदार, किनगावराजा.