चिखली : अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून आठवडाभरात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आर्थिक मदतीची रक्कम जमा करा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी शासनाकडे केली आहे.
पळसखेड नाईक, पाडळी, चौथा, गिरडा शिवारात रविकांत तुपकर यांनी पाऊस आणि पुरामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी केली. पुरामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच जनावरे वाहून मृत्युमुखी पडली आहेत. दुबार, तिबार पेरणीने शेतकरी आधीच कर्जबाजारी झाला आहे. त्यात ऐन भरात आलेली पिके अतिवृष्टीने वाया गेली आहेत. प्रामुख्याने सोयाबीन व कपाशीची मोठी हानी झाली आहे. याची दखल घेत सरकारने विविध प्रकल्पांचे काम सोडून आधी शेतकऱ्यांना मदतीचा हात देणे गरजेचे आहे. त्यासाठी तातडीने वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत. कुठलाही भेदभाव करू नये. पंचनाम्यांबाबत राजकीय पुढाऱ्यांचा हस्तक्षेपही थांबवावा, अशी मागणी तुपकर यांनी या पाहणी दरम्यान केली.
नदीकाठी सिमेंटच्या उंच भिंती बांधा
पूर आल्याने शेतांमध्ये पाणी घुसून पिकांचे नुकसान होते. ही हानी टाळता यावी याकरिता नद्यांचे खोलीकरण व रुंदीकरण होणे गरजेचे आहे. तसेच नदीकाठी सिमेंटच्या उंच भिंती उभारण्यात याव्यात, त्याचप्रमाणे बुलडाणा ते अजिंठा रोड राष्ट्रीय महामार्गाने नाल्या व्यवस्थित न काढल्याने शेतात पाणी घुसून पिके वाहून गेली. भविष्यात नुकसान होऊ नये म्हणून ठेकेदाराने सिमेंटच्या नाल्या बांधून द्याव्यात, अशी मागणीही तुपकर यांनी केली आहे.