२८ जूनच्या पावसाने आमखेड येथील एक लघू पाझर तलाव फुटून गेला आहे, तर अंबाशी येथील पाझर तलाव फुटण्याच्या मार्गावर आहे. पावसाने आमखेड, अंबाशी, गांगलगाव, पाटोदा, कोलारा, रोहडा, एकलारा या गावांतील शेती खरडून गेल्यासोबतच विहिरी गाळाने भरल्या, स्प्रिंकलरचे पाईप व ठिबक सिंचनाच्या नळ्या वाहून गेल्या. बैलगाड्या देखील वाहून गेल्या आहेत. यामध्ये सुमारे ३ हजार हेक्टर शेतजमीन खरडून गेल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या सर्व नुकसानीचा तातडीने पंचनामा करून, गाळाने भरलेल्या विहिरींच्या दुरुस्तीसाठी आणि वाहून गेलेल्या शेती साहित्यासाठी सुद्धा मदत देण्याची मागणी आमदार श्वेता महाले यांनी केली आहे.
आ. महाले यांच्यावरील शस्त्रक्रियेमुळे त्या सध्या रुग्णालयात असल्याने त्यांचे प्रतिनिधी म्हणून पंचायत समिती सभापती सिंधू तायडे, भाजपा तालुकाध्यक्ष डॉ. कृष्णकुमार सपकाळ, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष संतोष काळे, स्वीय सहायक सुरेश इंगळे यांनी उपकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद तायडे, कार्यकारी अभियंता जि. प. सिंचन पाटील, तहसीलदार डॉ. अजितकुमार येळे, तालुका कृषी अधिकारी अमोल शिंदे, मंडल अधिकारी अनंथा अंभोरे या अधिकाऱ्यांसमवेत प्रत्येक ठिकाणी जाऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली. त्यांच्याकडून माहिती घेत आ. महाले यांनी यासंदर्भाने शासनाकडे मागणी केली आहे.
अंबाशी पाझर तलावाची दुरुस्ती तातडीने करा!
देखभाल-दुरुस्तीअभावी तीस वर्षांपूर्वीचा आमखेडचा पाझर तलाव फुटला आहे. यामुळे शेकडो हेक्टर शेती खरडून गेली. याच महापावसाने अंबाशीच्या पाझर तलावाच्या भिंतीवरून पाणी गेल्याने भिंतीला ठिकठिकाणी भगदाड पडल्याने हा तलाव देखील फुटण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे या तलावाचा सांडवा मोठा करून तातडीची दुरुस्ती करून तलावासह तलावाखालील शेतीचे क्षेत्र वाचविणे गरजेचे असल्याने याबाबत तातडीने कारवाई करावी, अशी सूचना आ. महले यांनी अभियंता पाटील यांना केली आहे.
दरम्यान, आ. महालेंच्या निर्देशानुसार या तलावाच्या तात्पुरत्या स्वरूपाच्या डागडुजीचे काम हाती घेण्यात आले आहे.