चिखली तालुक्यात सार्वत्रिक पाऊस झालेला नसला तरी भाग बदलून होणाऱ्या पावसामुळे उंद्री, अमडापूर व धोडप मंडळात नुकसानकारक पाऊस झाला आहे. १६ व १८ जूनच्या पावसाने या मंडळातील माती बंधारे व तलाव फुटल्याने शेतजमिनी खरडून गेल्या आहेत. यामध्ये पेरणी केलेल्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तथापि, ज्यांची शेती खरडून गेली आहे त्यांची शेती आता पेरणीयोग्य राहिलेली नाही. यामुळे नुकसानग्रस्त शेतकरी खचले आहेत. आधीच कोरोनामुळे सर्वत्र हाहाकार उडालेला आहे. त्यात अनेक शेतकऱ्यांना बियाणे, खते, पीक कर्जे वेळेवर मिळाली नाहीत. अशा स्थितीत अस्मानी संकटाने कोसळलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तातडीने सर्व्हे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपयांची नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली असून, यानुषंगाने तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. यावेळी वंचितचे तालुकाध्यक्ष संजय धुरंधर, जिल्हा उपाध्यक्ष अशोक सुरडकर, प्रकाश बनकर, तालुका महासचिव बाळू भिसे, शहरप्रमुख महेंद्र हिवाळे, जितेंद्र निकाळजे, गजानन धुरंधर, प्रवीण खरात आदींची उपस्थिती होती.
अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचा सर्व्हे करून मदत द्या !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 4:23 AM