बुलडाणा: राज्य शासनाने जालना, बुलडाणा आणि वाशीम जिल्हे सीडहब म्हणून घोषित केलेले आहेत. सीडहबच्या पायाभूत सुविधांच्या दृष्टीने जालना हे केंद्रस्थानी असले तरी वाशीम आणि बुलडाणा जिल्ह्यात बीजोत्पादन शेडनेटला मोठा वाव आहे. त्यादृष्टीने बुलडाणा जिल्ह्यासाठी राष्ट्रीय कृषी योजनेंतर्गत अनुषंगिक मदत करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १५ आॅक्टोबर रोजी बुलडाणा येथे केली.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहामध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये त्याबाबत मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली. यावेळी पालकमंत्री मदन येरावार, खा. प्रतापराव जाधव, आ. डॉ. संजय कुटे, आकाश फुंडकर, डॉ. शशिकांत खेडेकर, डॉ. संजय रायमुलकर, जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांच्यासह अन्य उपस्थित होते. बुलडाणा जिल्ह्यात सध्याच्या स्थितीत शेडनेटमध्ये बिजोत्पादन करण्यात येत आहे. मात्र ते मर्यादीत स्वरुपात आहे. त्यानुषंगाने बीजोत्पादन शेडनेटची संख्या वाढविण्यासाठी २०० शेडनेट प्रस्तावीत करण्यात आले असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. बीजोत्पादनासाठी आर्थिक मदत, पायाभूत सुविधा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय कृषी योजनेतंर्गत मदत करण्यात येणार आहे. त्याबाबत मुख्य सचिवांना तशा सुचनाही दिल्या असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना सांगितले.जालना, बुलडाणा आणि वाशीम हे जिल्हे सीडहब म्हणून आधीच घोषित केले गेले आहेत. त्यामध्ये जालना येथे डेमोस्ट्रेशन, स्टोरेज सुविधा आणि मुख्य म्हणजे ड्रायपोर्ट उभे राहत आहे. त्यामुळे हा भाग मोठे सीडहब म्हणून उद्यास येत आहे. त्यादृष्टीने जालना जिल्ह्या लगतच्या बुलडाणा जिल्ह्यातील तालुक्यात बिजोत्पादन शेडनेट उभारण्याला मोठा वाव आहे. त्यातून बुलडाणा जिल्हा हा सीडहब म्हणून चांगल्या प्रकारे विकसीत होऊ शकतो, ही भूमिका घेऊन मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली आहे. यासोबतच नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेंतर्गतही चांगली कामे करून यास सहकार्य करता येईल. त्यादृष्टीनेही यंत्रणांनी प्रयत्न करावे, असेही मुख्यमंत्र्यांनी निर्देशित केले. सोमवारी मुख्यमंत्री बुलडाणा येथे जिल्हा आढावा बैठकीसाठी आले होते. ही बैठक आटोपल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यातील विविध विकास योजनांचा आढावा घेतला. गुन्हेगारी प्रवृत्ती व अवैध व्यवसाय करणार्यांच्या बाबतीत झीरो टॉलरन्स भूमिका पोलिस विभागाने स्वीकारावी, असे स्पष्ट निर्देश दिले.
बुलडाण्यातील सीडहबसाठी राष्ट्रीय कृषी योजनेंतर्गत मदत - मुख्यमंत्र्यांची घोषणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 5:18 PM
बुलडाणा जिल्ह्यासाठी राष्ट्रीय कृषी योजनेतंर्गत अनुषंगीक मदत करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १५ आॅक्टोबर रोजी बुलडाणा येथे केली.
ठळक मुद्देजालना, बुलडाणा आणि वाशीम हे जिल्हे सीडहब म्हणून आधीच घोषित केले गेले आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील तालुक्यात बिजोत्पादन शेडनेट उभारण्याला मोठा वाव आहे. ही बैठक आटोपल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यातील विविध विकास योजनांचा आढावा घेतला.