- विवेक चांदूरकर खामगाव : बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात सुनगाव येथे तीन बारव आहेत. या गावात वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या तीन विहिरी- बारव या वेगवेगळ्या कालखंडात बांधण्यात आल्या आहेत. या तीनही विहिरींमधून सुनगाव येथे प्राचीन काळापासून वस्ती होती. हे सिद्ध होते. गावात आवजी महाराजांचे प्रसिद्ध मंदिर आहे. तसेच महादेवाचीही पुरातन काळातील दोन मंदिरे आहेत. गावात असलेल्या एका महादेव मंदिरातीला मढीचे मंदिर म्हणतात. हे मंदिरही बरेच जुने आहे. मंदिराचे आता नव्याने बांधकाम करण्यात आले आहे. मात्र मंदिरातील खांब व गर्भगृहाच्या प्रवेशव्दारावरून मंदिर जुने असल्याचे निदर्शनास येते. या मंदिरासमोर असलेली विहिर पूर्णता दगडाची आहे. बांधकामावरून ही विहीर यादव काळाच्या पूर्वी बांधली असल्याचा अंदाज आहे. इतिहास संशोधक डॉ. शाम देवकर यांनी ही विहीर चालुक्य काळातील असल्याचे सांगितले. तसेच गावात आणखी असलेल्या महादेवाच्या मंदिराला सराईचे मंदिर म्हणून ओळखल्या जाते. या मंदिरासमोरही एक विहीर आहे. विटांमध्ये बांधकाम असलेली ही विहीर मध्ययुगीन कालखंडातील आहे. या मंदिरात एक भुयार आहे. गावाच्या बाहेर एका शेतामध्ये तीन मजली विहीर आहे. या विहिरीला चोराची विहीर म्हणतात. विटा आणि चुना-मातीत या विहिरीचे बांधकाम केले आहे. या विहिरीत तीन मजले आहेत. वरच्या मजल्यावर जाण्यासाठी दोन्हीकडून रस्ता आहे. डाव्या बाजुकडील रस्ता मलबा पडल्यामुळे बंद झाला आहे. येथे असलेल्या कमानीमध्ये सध्या शिवलिंग ठेवले आहे. मध्यातल्या मजल्यावर जाण्यासाठी छोटेसे भूयार आहे. दुसºया मजल्यावरूनच खालच्या मजल्यावर जाण्यासाठी पायºया आहेत. या विहिरीचे बांधकाम मूगलपूर्व काळात झाल्याचे बांधकामावरून निदर्शनास येते. पूर्वीच्या काळात या विहीरीत चोरांचे वास्तव्य असावे, त्यामुळे चोरांची विहीर म्हटल्या जाते. गावात असलेल्या नागरिकांच्या पाण्याची व्यवस्था करण्याकरिता विहिरी व बारवचे बांधकाम करण्यात येत होते. या गावात असलेल्या तीन विहिरी व त्यांचा वेगवेगळा कालखंड पाहता गावात अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात लोकवस्ती असावी असा अंदाज आहे.
वारसा : सुनगावचे प्राचीनत्व सिद्ध करणारी तीन मजली विहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2020 8:32 PM
विटांमध्ये बांधकाम असलेली ही विहीर मध्ययुगीन कालखंडातील आहे.
ठळक मुद्दे जळगाव जामोद तालुक्यात सुनगाव येथे तीन बारव आहेत.गावाच्या बाहेर एका शेतामध्ये तीन मजली विहीर आहे. वरच्या मजल्यावर जाण्यासाठी दोन्हीकडून रस्ता आहे.