ओमप्रकाश देवकर । लोकमत न्यूज नेटवर्कहिवरा आश्रम: लव्हाळा येथील मोहखेड शिवारातील शेतकर्यांनी मेहकर तालुका कृषी विभागाच्या वतीने नाल्यावर सिमेंट बांधाचे काम केल्यामुळे सध्या वाहून जाणारे पाणी अडवून शेतीचे हंगामी सिंचन करण्याची सोय उपलब्ध झाली आहे. त्यामुळे शेतकर्यांच्या परिश्रमाला कृषी विभागाच्या जलयुक्त शिवाराची जोड मिळाल्याचे दिसून येत आहे. मेहकर तालुक्यातील लव्हाळा येथील मोहखेड शिवारात शिवदास अमृता सवडतकर यांची शेती आहे. या नाल्यातून पावसाळ्यात व हिवाळ्यात पाणी वाहत असे. हे वाहून जाणारे पाणी सवडतकर यांनी बर्याच वेळा अडविले. त्यासाठी त्यांनी अनेक वेळा मातीचा बांधसुद्धा टाकला; पण पाणी पूर्णत: अडविल्या जात नसे. शिवदास सवडतकर यांची जमीन याच नाल्याच्या बाजूबाजूला आहे. त्यांच्याकडे विहीर आहे, परंतु पूर्णपणे सिंचन होत नाही. सवडतकर व इतर शेतकर्यांची पाण्यासाठीची मेहनत बघता सन २0१६-१७ मध्ये जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत कृषी पर्यवेक्षक विनोद मोरे, कृषी सहायक दीपक बोरे यांनी मंडळ कृषी अधिकारी मारोती तोडकर व तालुका कृषी अधिकारी विजय सरोदे यांच्या मार्गदर्शनात सदर नाल्यावर सिमेंट बांधाचे काम पूर्ण केले. या कामाची फलo्रुती या खरीप व रब्बी हंगामातसुद्धा दिसून येत आहे. या सिमेंट बांधामुळे वाहून जाणारे पाणी अडविल्या गेल्याने या नाल्यात पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे गुरांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध तर आहेच शिवाय यावर्षीच्या सोयाबीन, तूर, हरभरा या पिकांचेसुद्धा हंगामी सिंचन केले. या जलयुक्त शिवार अभियानाचा सिमेंट बांधामुळे रामकोरबाई आमृता सवडतकर, भानुदास गणेश कंकाळ, संजय दशरथ कंकाळ, विनोद मदन देशमुख व इतर शेतकर्यांना याचा चांगला उपयोग होत आहे.
पूर्वी या नाल्याचे पाणी वाहून जात होते; मात्र सिमेंट बांधामुळे ते पाणी अडविल्या जात असल्याने शेतकर्यांना हंगामी सिंचन करता येणे शक्य झाले आहे. या सिमेंट बांधाची व नाल्याची या पुढील काळजी शेतकर्यांनी घ्यावी म्हणजे शेतीला फायद्याचे होईल.- विजय सरोदे, तालुका कृषी अधिकारी, मेहकर