लोकमत न्यूज नेटवर्कलोणार: ऐतिहासिक, पौराणिक आणि वैज्ञानिक महत्त्व असलेल्या लोणार सरोवरातील सासू-सुनेची विहीर ही सलग तिसऱ्या वर्षी उघडी पडली आहे. सौभाग्य तीर्थ किंवा योनी कुंड म्हणून तिला प्रामुख्याने ओळखले जाते. सासू-सुनेची विहीर म्हणूनही या विहीरीचे नाव प्रचलीत आहे. सरोवराच्या पाण्याच्या घटत्या पातळीमुळे ही विहीर उघडी पडली आहे.अवर्षणाचा फटका लोणार सरोवरासही बसत असून पाणी पातळी घटल्यामुळे ही विहीर उघडी पडली आहे. गेल्या काही वर्षापासून सरोवराचे पाणी उन्हाळ््या दरम्यान कमी होत असल्याने सरोवरात असलेल्या कमळजा देवीच्या मंदिरा समोर असलेली ही विहीर उघडी पडत आहे. २०१७ मध्ये या विहीरीचे प्रथमत: काठ दिसून आले होते. २०१८ मध्ये ही विहीर पूर्णत: उघडी पडली होती. यंदाही गत वर्षीप्रमाणेच ही विहीर उघडी पडली आहे. त्यामुळे सरोवरात उतरणार्या पर्यटकांसाठी ही विहीर आकर्षण बनली आहे. जवळपास १९९८ मध्ये प्रथमत: ही विहीर सहजगत्या दृष्टीपथास पडली होती. मात्र नंतर सरोवराची पाणीपातळी नंतर अचानक वाढल्यामुळे ही विहीर पुन्हा पाण्यात गेली होती. आता ती पुन्हा उघडी पडल्याने अभ्यासकांसाठी हा एक उत्सूकतेचा विषय आहे. विशेष म्हणजे लोणार सरोवराची अग्नेय दिशेकडून वायव्य दिशेकडे जातांना खोली कमी होत गेलेली आहे. नेमक्या अग्नेय दिशेलाच ही विहीर असल्याने पाणी पातळी खरोखरच खालावल्याचे जाणवत आहे. लोणार सरोवराचा पौराणिक ग्रंथामध्येही उल्लेख आढळतो. सरोवरातील कमळजा देवीच्या मंदिरानजीक पौराणिक कथेनुसार अगस्ती ऋषींची पत्नी लोपमुद्राने राम वनवासात येथे आले असताना सितेची ओटी भरली होती अशी अख्यायिका आहे. त्यामुळे कमळजा देवीचे मंदिर परिसरात प्रसिद्ध आहे. मराठवाडा, खान्देश आणि विदर्भातील अनेक नागरिकांची ही देवी कुलदेवता आहे. या देवीच्या मंदिरासमोरच ही विहीर आहे.
विहीरीतील पाण्याची चव गोड आणि खारटसासू-सुनेच्या या विहीरीतल देवीच्या मंदिराकडील पाणी हे गोड आहे तर त्याच्या विरुद्ध बाजूचे पाणी हे खारे आहे. त्यामुळेच तिला सासू-सुनेची विहीर असे संबोधल्या गेले आहे. भारतीय परंपरेत जलतीर्थ, स्थलतीर्थ, कामतीर्थ, मोक्षतीर्थ असे तिर्थाचे विविध प्रकार सांगण्यात आले आहेत. जलतिर्थामुळे शारीरिक शुद्धी होते व मन प्रसंन्न होते, असी धारणार आहे. जलतिर्थ व मोक्षतीर्थ असे दुहेरी सासू-सुनेच्या विहीरीचे पौराणिक महत्त्व सांगितल्या जाते. त्यामुळे ही विहीर पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्र बिंदू आहे.